लग्न, नवरा-बायकोंचे नाते, मराठी तरुण-तरुणींचा लग्नसंस्थेबद्दलचा विचार, फेसबुक-ट्विटरच्या आधारे आधुनिक जीवनशैली जगत असतानाही लग्नसंस्थेबद्दलचे मराठी तरुण-तरुणींचे विचार मात्र खूप आधुनिक नसतात हे सर्वानाच माहीत असलेले पडद्यावर दाखविण्याचा विचार करताना दिग्दर्शकाने फक्त संवादांवर भर दिला आहे. त्यामुळे हृषिकेश-अमृता यांची लग्नानंतरची गोष्ट फिकी ठरते. नायक-नायिकेची नवी जोडी आणि सहकलावंतांचीही नवी जोडी, उत्कृष्ट छायालेखनामुळे तजेलदार ‘लूक’ असलेला हा सिनेमा प्रेक्षकाला भिडण्यात काहीसा फिका ठरतो.
केदार शिंदेंच्या नाटकाबरोबरच ‘नवा गडी, नवं राज्य’ या समीर विद्वांस दिग्दर्शित नाटकावरच बेतलेला ‘टाईम प्लीज..’ हा सिनेमा असा योगायोग या आठवडय़ात झाला. नाटकाची संहिता रूपेरी पडद्यावर मांडताना बदल करावेच लागतात हे प्रेक्षकांनाही मान्य असतेच. चित्रपटाचा विषय व्यापक करण्यासाठी, वेगवेगळ्या स्तरांतील प्रेक्षकांना रुचेल अशा पद्धतीने बदल करणे स्वाभाविकही असते. परंतु, हे बदल करताना कथानकात अनेक कच्चे दुवे राहिलेत त्यामुळे चित्रपटातील नायक-नायिकेच्या पलिकडे असलेल्या अन्य छोटय़ा छोटय़ा व्यक्तिरेखा फुलत नाहीत.
आयटी क्षेत्रात उच्चतम पगाराची नोकरी करणारा सरळसाधा आई-वडिलांविना जगणारा हृषिकेश देशपांडे (उमेश कामत) हा आजच्या पिढीचा तरुण आहे. अमेरिकेतून परतल्यानंतर एक सरळ ‘सॉफिस्टेकेटेड’ उच्च मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व तो करतोय. पुण्यात धमाल महाविद्यालयीन जगणाऱ्या अमृता साने (प्रिया बापट) हिच्याशी त्याचा विवाह होतो. अल्लड, बिनधास्त पुणेरी अमृता लग्नानंतर काही दिवस गेल्यानंतर सर्वसामान्य गृहिणीसारखी आपली पत्नी बनून राहिली तर चांगले एवढी माफक अपेक्षा हृषिकेशची असते. परंतु, अमेरिकेचे आधुनिक जग अनुभवलेल्या हृषिकेशमधील तद्दन पुरुषी वृत्ती पाहून दचकलेली अमृता त्याच्यापासून दुरावत जाते. एकमेकांना समजून घेण्यासाठी ‘एक ब्रेक’ घेण्याची गरज हृषिकेश बोलून दाखवितो आणि दुरावा कमी होण्याऐवजी काही घटनांमुळे आणखी वाढत जातो.
एकाच समाजस्तरातील असूनही भिन्न आवडीनिवडी, भिन्न विचारसरणी, जगण्याकडे पाहण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन आणि समजूतदारपणाच्या अपेक्षा फक्त जोडीदाराकडून करण्याची वृत्ती अशा सगळ्या गोष्टींचे दर्शन दिग्दर्शकाने चांगल्या पद्धतीने दाखविल्या आहेत. अमृताचा लहानपणापासूनचा मित्र असलेला हिम्मत (सिद्धार्थ जाधव) तिच्या घरी राहायला येतो आणि हृषिकेशदेखत तिला मिठी मारतो, तिचे लाड करतो, तिच्या खोडय़ा करतो हे सगळे पाहिल्यावर हृषिकेशच्या मनात शंका उत्पन्न होणे स्वाभाविक आहे. हिम्मतचे वागणे प्रेक्षकांना अंमळ खटकण्याची शक्यता दिग्दर्शकाने लक्षात घेतलेली दिसत नाही. आधुनिक विचार करणारी तरुणाई असली तरी समाजाचा पगडा त्यांच्यावर असतोच हे दिग्दर्शकाने चांगले दाखविले आहे. अमृता-हिम्मत यांच्या नात्यामुळे हृषिकेशच्या मनात निर्माण झालेला संशय आणि राधिका दाभोळकर (सई ताम्हणकर) हिच्या घरी येऊन काम करण्यामुळे राधिका-हृषिकेश यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय अमृताच्या मनात येणे या दोन्ही घटना संयुक्तिकपणे दाखविल्या आहेत. परंतु, या संशयकल्लोळाची उकल करताना राधिकाचे लग्न-घटस्फोट दोन्ही झालेत हे आधी न दाखविता किंवा त्याचे सूचन आधी न करता तिला लग्न करायचे नाही एवढेच दिग्दर्शक मांडतो. तिचे लग्न अयशस्वी ठरते, तसेच अमृताच्या आईचे शुभदा साने (सीमा देशमुख) व अमृताच्या वडिलांचे लग्नही अयशस्वी ठरलेय हे कथानकात खूप उशिरा येत असल्यामुळे अमृता-हृषिकेश यांच्यात निर्माण झालेले वितुष्ट याचा थांग प्रेक्षकाला लागत नाहीत. राधिकाची वैयक्तिक आयुष्यातील गोष्ट दाखविलेलीच नाही. फक्त राधिका आणि शुभदा साने यांच्या लग्नाच्या अयशस्वीतेतून अमृताला धडा मिळतो एवढेच चित्रपट सूचित करतो. दुसरीकडे हिम्मतचे वैयक्तिक आयुष्य दाखविलेले नाही. हिम्मतशी बोलायला त्याच्या गावातील घरी जाऊन पोहोचलेल्या हृषिकेशला घरातून भांडणांचे आवाज येतात, भांडी फेकण्याचा अनुभव येतो. यातून दिग्दर्शक-लेखकांना प्रत्येक संसारात अशा गोष्टी घडतातच, ते अपरिहार्य हे दाखवायचे का ते स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे एकंदर ‘फ्रेश लूक’ आणि उमेश कामत-प्रिया बापटच्या पडद्यावरील जोडीसह सर्व कलावंतांनी चांगला अभिनय करूनही चित्रपट भिडत नाही. म्हणून प्रेक्षकाचे फिके मनोरंजन करणारा ठरतो.
एव्हरेस्ट एण्टरटेन्मेंट प्रस्तुत
टाईम प्लीज – लव्हस्टोरी लग्नानंतरची!
निर्माते – अनिष जोग, अभिजीत जोग, सौरभ गाडगीळ
दिग्दर्शक – समीर विद्वांस
कथा-पटकथा-संवाद-गीते – क्षितीज पटवर्धन
संगीत – ऋषिकेश कामेरकर
छायालेखक – अभिजीत आबदे
कलावंत – उमेश कामत, प्रिया बापट, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, सीमा देशमुख, माधव अभ्यंकर, वंदना गुप्ते, मिलिंद फाटक व अन्य.