लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वाचेच लाडके दैवत असलेल्या गणरायाला गणेशोत्सवानंतर वाजत गाजत निरोप देण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. या ‘वाजत गाजत’च्या व्याख्येत आजकाल डीजेपासून बँजोपर्यंत अनेक गोष्टी घुसल्या आहेत. मात्र आपल्या गणपतीला अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि तरीही वाजत गाजत निरोप देण्यासाठी अंधेरीतील विजय नगर आणि चंद्रशेखर या दोन सोसायटय़ांमधील रहिवाशांनी अनोखे ध्वजपथक तयार केले आहे. या दोन सोसायटय़ांच्या मैत्रीतून तयार झालेल्या या पथकाचे नावही ‘मैत्री पथक’ असेच ठेवण्यात आले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सहा वर्षांच्या मुलापासून ४५ वर्षांच्या माणसांपर्यंत सर्वाचा समावेश असलेले हे ध्वजपथक मुंबईच्या रस्त्यांवर गणरायाला तालबद्धपणे निरोप देताना दिसणार आहे.
ध्वजपथक ही खरी पुण्याची मिरासदारी मानली जाते. पुण्याच्या डेक्कन भागातील विमलाबाई गरवारे प्रशालेचे विद्यार्थी गेली २५ वर्षे ध्वजपथकात सहभागी होत आहेत. सध्या महाराष्ट्र ढोल ताशा पथक असोसिएशनचे अध्यक्ष असलेले अनिल गाडगीळ त्यांना गेली अनेक वर्षे मार्गदर्शन करतात. विजय नगर कॉलनीत राहणाऱ्या सुकृता पेठे या मुळच्या पुण्याच्या आणि विमलाबाई गरवारे प्रशालेच्या विद्यार्थीनी! साठय़े महाविद्यालयात भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका असलेल्या सुकृता पेठे आणि जेट एअरवेजमध्ये व्यवस्थापक या हुद्दय़ावर काम करणारे त्यांचे पती अमर पेठे यांनी पुढाकार घेत पुण्याच्या धर्तीवर आपल्या कॉलनीचे ध्वजपथक तयार करण्याचा चंग बांधला. त्यासाठी ढोल, ताशे, टिपऱ्या, ध्वज हे सर्वच साहित्य विकत घेतले.
पुण्यातील मानाच्या गणपतीप्रमाणे आपल्या कॉलनीचा गणपतीही अशा शिस्तबद्ध पद्धतीने वाजतगाजत जावा, अशी आपली इच्छा होती. ध्वजपथकाची उभारणी करण्यासाठी आम्ही पुण्याहून गाडगीळ सरांना मार्गदर्शन देण्यासाठी बोलावले. आता वयाच्या ६५व्या वर्षीही गाडगीळ सर हसत हसत आम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी दोन-तीन वेळा आले, अशी माहिती सुकृता पेठे यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना दिली. सुरुवातीला कॉलनीतील फक्त आठच लोक ध्वजपथकात येण्यासाठी तयार होते. विशेष म्हणजे हे आठही जण पेठे यांच्याच कुटुंबातील होते. मात्र आता ही संख्या वाढली असून ती ७० पर्यंत पोहोचली आहे.
सध्या आम्हाला पार्ले पूर्व येथील सुभाष रोडवरील बटण फॅक्टरीचा गणपती आणण्यासाठी आमंत्रण मिळाले आहे. त्याशिवाय आम्ही आमच्या कॉलनीचा गणपती वाजतगाजत नेणार आहोत. आम्हाला या पथकाच्या माध्यमातून पैसे कमवायचे नाहीत. आमच्यापैकी सगळेच विविध कार्यालयांत चांगल्या हुद्दय़ावर कामाला आहेत. मात्र आपल्या आवडत्या गणरायाला पारंपरिक पद्धतीने निरोप द्यावा, यासाठी आम्ही हे ध्वजपथक उभारल्याचे पेठे यांनी सांगितले. विशेष म्हणजे एखाद्या मंडळाकडून आमंत्रण आल्यास आपण नक्कीच तेथेही वाजवण्यास जाऊ, असेह त्यांनी स्पष्ट केले. अद्याप असे आमंत्रण आले नसले, तरी ज्या मंडळांना ध्वजपथकाच्या शिस्तबद्ध लयीत आपल्या गणरायाला निरोप द्यायचा आहे, त्यांनी ९९६७३६३१७६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्या म्हणाल्या.

काय आहे ध्वजपथक?
या ध्वजपथकात तीन गट आहेत. एक लहान मुलांचे टिपरी पथक. या मुलांच्या हातात अ‍ॅल्युमिनिअमच्या छोटय़ा टिपऱ्या देऊन त्या टिपऱ्यांच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने काही ताल बसवले जातात. दुसरा भाग हा ढोल आणि ताशा पथकाचा आहे. २० ढोल पुणेरी पद्धतीने एकत्र वाजले, तरी त्या आवाजाचा कानांना त्रास होत नाही. त्यामुळे या ढोल ताशा वादकांना ढोलाचे काही हात शिकवण्यात आले आहेत. तर तिसरे पथक आहे ध्वजपथक. या पथकात २४-३२ जण सहभागी असतात. प्रत्येकाच्या हातात ध्वज असतो आणि ढोलाच्या तालावर हा ध्वज लयबद्धपणे नाचवत एक सुंदर आविष्कार घडवला जातो.
ध्वजपथकाची आचारसंहिता
ध्वजपथकात सहभागी होणाऱ्यांसाठी काही नियम आखून दिले आहेत. सरावाच्या वेळी किंवा अगदी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतही या पथकातील मुला-मुलींवर कोणीही गुलाल उधळायचा नाही. तसेच पथकात सहभागी होणाऱ्या कोणीही नशापाणी करणेही निषिद्ध आहे. ध्वजपथकाच्या मुलामुलींसाठी पोशाखही ठरवून देण्यात आला आहे. पांढरा कुर्ता, सलवार आणि कंबरेला भगवा शेला या पोशाखातच ध्वजपथकातील मुले-मुली किंवा स्त्री-पुरुष असले पाहिजेत, असा नियमही या पथकाने केला आहे. तसेच आमंत्रणांमधून काही पैसे मिळाले, तर ते ध्वजपथकाचे सामान विकत घेण्यास वापरले जातील किंवा समाजकार्यासाठी दान केले जातील, असेही मैत्री ध्वजपथकाने ठरवले आहे.
याआधीची ध्वजपथके
गिरगावात एका मंडळाने याआधी मुंबईत ध्वजपथक तयार केले आहे. मात्र या ध्वजपथकात वाजवण्यासाठी येणारे लोक हे एकाच भागात राहणारे नसून मुंबईच्या विविध भागांतून येतात. डोंबिवलीमध्येही असे ध्वजपथक आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी निघणाऱ्या स्वागत यात्रेत हे ध्वजपथक एक आकर्षण असते. ठाण्यातही गेली अनेक वर्षे हिंदु जागृती गणेशोत्सव मंडळाचा गणपती असाच शिस्तबद्ध आणि लयबद्ध पद्धतीने वाजतगाजत नेला जातो.

Story img Loader