सुहास शिरवळकर यांच्या लेखणीची जादू, संजय जाधव यांचे दिग्दर्शन, सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय आणि त्यास मिळालेली गीत व संगीताची साथ यांच्या जोरावर नाशिकच्या तरूणाईला वेड लावणारा ‘दुनियादारी’ हा चित्रपट मैत्रीवरच आधारित असल्यामुळे यावेळी ‘फ्रेंडशिप डे’ चे मुख्य आकर्षण ठरणार असल्याचे ध्यानात घेत येथील काही मल्टिप्लेक्समध्ये शनिवार व रविवार या दोन दिवसांसाठी या चित्रपटाच्या खेळांची संख्या वाढविण्यात आली आहे. तरूणाई दुनियादारीमधील डीएसपी, श्रेयस, अश्क्या, मिनू, शिरीन, साई यांच्या संगतीने फेंडशिप डे साजरा करणार असल्याने या दोन दिवसांचे काही खेळ ‘हाऊसफुल्ल’ ही झाले आहेत.
‘चेन्नई एक्स्प्रेस’ बरोबरचा वाद असो किंवा तरूणाईच्या मनाला भिडणारी भाषा असो, दुनियादारी हा चित्रपट प्रदर्शनापासूनच चर्चेत राहिला आहे. महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणेच नाशिकमधील तरूणाईलाही या चित्रपटाने भुरळ घातली असून एरवी शुक्रवारी कोणता नवीन हिंदी चित्रपट रिलीज होतो, याची उत्सुकतेने विचारणा करणाऱ्या तरूणाईच्या तोंडी सध्या फक्त दुनियादारी आणि दुनियादारी हे एकच नाव आहे. दुनियादारीच्या लोकप्रियतेत नाशिकमध्ये दिवसेंदिवस कशी वाढ होत गेली ते आता पाहू. शहरातील पाच मल्टिप्लेक्समध्ये दुनियादारी प्रदर्शित झाला तेव्हा त्याच्या खेळांची संख्या केवळ सहा होती. त्यातही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची बऱ्यापैकी गर्दी असणाऱ्या कॉलेजरोडवरील सिनेमॅक्समध्ये तर केवळ सायंकाळी साडेसात वाजेता एकच खेळ होता. महाविद्यालयीन विद्यार्थी या चित्रपटाकडे कितपत वळतील याविषयी शंका असल्याचेच हे लक्षण. कॉलेजरोडवरील मल्टिप्लेक्समध्ये ही स्थिती तर, नाशिकरोडच्या ‘सिनेमॅक्स रेजिमेंटल प्लाझा’ मध्ये हा चित्रपट प्रदर्शितच करण्यात आला नव्हता. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मात्र सर्वच चित्र बदलले. १९८० च्या दशकातील कादंबरीवर बेतलेला चित्रपट असूनही त्या वेळचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या तोंडी असलेले संवाद, त्यांची फॅशन, वाद, हाणामारी, गीत, संगीत हे सर्वकाही तरूणाईला भावले. इतके की दुसऱ्याच आठवडय़ात खेळांची संख्या सहावरून दहावर पोहोचली. पहिल्या आठवडय़ात एकही खेळ नसणाऱ्या रेजिमेंटल प्लाझामध्ये दुसऱ्या आठवडय़ात तीन खेळ सुरू झाले. खेळांची संख्या वाढत गेली त्याप्रमाणे प्रेक्षकांची संख्याही वाढत गेली. दोन ऑगस्टपासून खेळांची संख्या दहावरून सतरापर्यंत गेली आहे. त्यात रेजिमेंटल प्लाझामध्ये सकाळी दहा ते रात्री दहा असे दिवसातून पाच खेळ, फेम, दिव्या अ‍ॅडलॅब्ज या ठिकाणी चार खेळ तर शनिवार व रविवारसाठी सिटी सेंटर मॉलमध्ये तीन खेळ, कॉलेजरोडवरील सिनेमॅक्समध्ये दोन खेळ ठेवण्यात आले आहेत. याशिवाय दामोदर या एकपडदा चित्रपटगृहातही दुनियादारी सुरू आहे.
नाशिकमध्ये या चित्रपटाच्या लोकप्रियतेची चढती कमान पाहून मल्टिप्लेक्स चालकही बुचकळ्यात पडले आहेत. कारण  नाशकात मल्टिप्लेक्समध्ये याआधी ‘मी शिवाजीराजे..’ ‘दे धक्का’ यांसारख्या चित्रपटांना प्रेक्षकांनी गर्दी केली असली तरी दुनियादारी त्यांच्यापेक्षा कितीतरी पुढे गेल्याचे दिसत आहे.   

Story img Loader