मापात पाप करणाऱ्या ५५०हून अधिक विक्रेत्या आणि उत्पादकांवर वैध मापनशास्त्र विभागाने कारवाई केली असून, वर्षभरात अशा कारवायांच्या माध्यमातून २७ लाख रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी रमेश दराडे यांनी दिली. राष्ट्रीय ग्राहकदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वजनमापे प्रमाणित आहेत की नाही, याकडे ग्राहकांनी लक्ष द्यायला हवे. वस्तूंची खरेदी करताना आयएसओ ट्रेडमार्क, योग्य प्रकारे केलेले पॅकिंग, उत्पादकाचा पत्ता, किंमत याकडे ग्राहकांनी लक्ष द्यावे, अशी माहितीही दराडे यांनी या वेळी दिली. अन्नभेसळ होऊ नये यासाठीही जनतेने जागरूक राहण्याची गरज आहे. भेसळ कशा प्रकारे ओळखावी, याची माहिती देणारे प्रदर्शन ग्राहकदिनाच्या निमित्ताने ज्ञानप्रकाश विद्यालयात लावण्यात आले होते. ग्राहकदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमास प्रभारी जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी सागर तेरकर, ज्ञानप्रकाश विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश जवळकर, आदी उपस्थित होते.

Story img Loader