हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांमध्ये काळा पैसा गुंतलेला असतो, हे उघड गुपित आहे. मात्र, नुकतेच एका मराठी चित्रपटातही अशा प्रकारची गुंतवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. दिल्ली, लखनऊ, नागपूर आदी शहरांमध्ये हजारो लोकांना फसवून ६०० कोटींच्या आसपास पैसे लुटणाऱ्या उल्हास खैरे याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या व्यक्तीने सिद्धार्थ मराठे या नावाने एका मराठी चित्रपटाच्या निर्मितीतही पैसे गुंतवल्याची बाब उघडकीस आली. या घटनेनंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रत्नागिरी आणि मुंबईत संबंधित दिग्दर्शकाची कसून चौकशी केली गेली.  या दिग्दर्शकाने त्याच्यासह तंत्रज्ञ व कलाकारांना दिलेली आगाऊ रक्कम परत करावी, असे त्याला सांगितल्याचे कळते.
उल्हास खैरे याने लोकेश्वर जैन या नावाने दिल्लीत अनेकांना कोटय़वधी रुपयांना फसवले. त्यानंतर त्याने गेल्या वर्षी रत्नागिरीत सिद्धार्थ मराठे या नावाने आसरा घेतला होता. आपल्याला कोकण आवडले असून आपण येथेच राहाण्याचा विचार करीत आहोत, असे सांगत त्याने एका मध्यस्थाकडून रत्नागिरीच्या पोलीस आयुक्तांच्या बंगल्याजवळील एक बंगला विकत घेतला. आपल्याला मराठी चित्रपटाची निर्मिती करायची असून त्याबाबत कोणाची मदत होऊ शकेल, अशी विचारणाही त्याने या मध्यस्थाकडे केली.
या मध्यस्थाने संबंधित दिग्दर्शकाशी संपर्क साधून सिद्धार्थ मराठे (उल्हास खैरे) आणि या दिग्दर्शकाची भेट घडवून आणली. आपल्याला त्या वेळी मराठे अत्यंत सरळ आणि साधे वाटले होते. तसेच तो माणूस आमच्याशी अत्यंत सभ्यपणेच वागला होता, असे या दिग्दर्शकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. विशेष म्हणजे हिंदीत काही चित्रपटांमध्ये मोलकरणीचे काम करणाऱ्या आणि आता मराठीत काही चरित्र भूमिका करणाऱ्या एका अभिनेत्रीची देखील मराठे याच्याशी ओळख होती. मराठेला आमची संहिता आवडल्यानंतर त्याने या वर्षीच्या एप्रिल महिन्यात धनादेशामार्फत आम्हा सर्वाना पैसे दिले. त्याप्रमाणे आम्ही कलाकारांच्या तारखा मिळवत त्यांनाही धनादेश दिले. मराठे याने दिग्दर्शक आणि मुख्य कलाकारांना प्रत्येकी ११ हजार आणि इतर कनिष्ठ तंत्रज्ञांना प्रत्येकी पाच हजारांचे धनादेश दिल्याचेही या दिग्दर्शकाने सांगितले. यात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक बडय़ा कलाकारांचाही समावेश आहे. त्यानंतर आमच्या तंत्रज्ञांच्या चमूने चित्रिकरणासाठी विविध स्थळांची पाहणी करून ते काम नक्की केले होते. तसेच या १४ नोव्हेंबरपासून आम्ही चित्रिकरणही चालू करणार होतो, असेही या दिग्दर्शकाने सांगितले.
उल्हास ैरे, ऊर्फ सिद्धार्थ मराठे याला १० नोव्हेंबर रोजी रत्नागिरीतून अटक झाल्यानंतर संबंधित दिग्दर्शकाला मुंबईच्या ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावले. या वेळी अधिकाऱ्यांनी दिग्दर्शकाला, मराठे याने दिलेली रक्कम परत करण्याच सांगितले. मात्र, आमच्या सर्व कलाकारांनी त्यांच्या तारखा संबंधित चित्रपटासाठी राखून ठेवल्या होत्या; तसेच तंत्रज्ञांच्या चमूनेही कामाला सुरुवात केली होती. त्यामुळे आम्ही पैसे कसे परत करणार, असा प्रश्न हा दिग्दर्शक विचारत आहे.
या प्रकरणात आमची फसवणूक झाली असली, तरी पुढे अशा प्रकारची फसवणूक टाळता येणारी नाही. कोणताही दिग्दर्शक हा निर्मात्याला, तू हे पैसे कुठून आणलेस, असे विचारू शकत नाही. त्यामुळे याबाबत चित्रपट महामंडळाने ठोस भूमिका घ्यायला पाहिजे, अशी अपेक्षा या दिग्दर्शकाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे उल्हास खैरे, ऊर्फ सिद्धार्थ मराठे याने आपल्या निर्मिती संस्थेची नोंद चित्रपट महामंडळामध्ये केल्याची माहितीही सूत्रांकडून समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा