राजूमहाराजाचा दरबार म्हणजे दैवी शक्तीने असाध्य रोग बरे होणार, असे कानोकानी पसरले नि या दरबारात अंधश्रद्धाळू भाविकांची एकच रीघ सुरू झाली. ही गर्दी एवढी वाढली की प्रत्येक सोमवारी व गुरुवारी दूरच्या ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे प्रमुख रस्त्यावरील रहदारीला अडथळा होऊ लागला. परंतु हा अडथळाच या भोंदूचा दरबार बंद पडून त्याचा गाशा गुंडाळण्यास कारणीभूत ठरला!
औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा येथील राजूमहाराजांचा सोमवार व गुरुवारी दरबार भरत असे. या दरबारात ठिकठिकाणाहून भक्त मोठय़ा संख्येने हजेरी लावत. त्यांच्या वाहनांमुळे हिंगोली-परभणी रस्त्यावरील वाहतूक वरचेवर विस्कळीत होत होती. रहदारीचा अडथळा लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी हस्तक्षेप करून हा दरबार बंद पाडला. गेल्या सहा महिन्यांपासून बोरजा येथील राजू पांडुरंग वानखेडे (वय २५) याला दैवी शक्ती प्राप्त होऊन असाध्य रोग बरे होत असल्याची चर्चा हिंगोलीसह आसपासच्या भागात पसरत गेली. त्यातून दर सोमवारी व गुरुवारी या बाबाचा दरबार भरू लागला. अंधश्रद्धेमुळे लोक खास वाहने करून दरबारात हजेरी लावू लागले. त्यांच्या वाहनांमुळे रहदारीला अडथळा होत होता. त्यामुळे संभाव्य अपघात, हॉटेल्समधील निकृष्ट खाद्यपदार्थ यामधून काही अप्रिय वा अनुचित प्रकार घडल्यास त्याचे दुष्परिणाम सर्वानाच भोगावे लागतील, ही बाब पोलिसांनी लोकांना पटवून दिली आणि सर्वानीच राजूमहाराजाचा दरबार बंद करण्यास संमती दर्शविली. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे राजू महाराजाचा दरबार सोमवारी भरला नाही.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा