कृषी विभाग, कोल्हापूर व कृषी तंत्रज्ञान यंत्रणा (आत्मा) कोल्हापूर यांच्या समन्वयाने ‘खळ्यातून थेट तुमच्या घरी’ या संकल्पनेतून या वर्षीही १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत शेतकरी ते ग्राहक थेट विक्रींतर्गत तांदूळ महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन सासने ग्राऊंड ताराबाई पार्क येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन १६ फेब्रुवारी रोजी सकाळी होणार आहे.    
दरवर्षी तांदूळ महोत्सवास ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. मागील वर्षीही तांदूळ महोत्सवात एकूण ४ हजार ५८९ क्विंटल तांदळाची विक्री ३ दिवसांच्या कालावधीत करण्यात आलेली होती. तर ९६५ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविली होता. हा अनुभव जमेस धरून चालू वर्षीही कृषी विभागाने नेटके नियोजन केले आहे. या वर्षांसाठी ५ हजार क्विंटल तांदूळ विक्रीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून सुमारे १ हजार शेतकऱ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. आजअखेर ४ हजार ७०० क्विंटल तांदळाची उपलब्धता निश्चित झाली असून त्यात विविध ७३ जातींचा समावेश आहे.     
मागील वर्षी ६८ तांदळाच्या वाणांची विक्री करण्यात आली होती. तर एकूण १ कोटी ७० लाख रकमेची उलाढाल ३ दिवसांत करण्यात आली होती. यावर्षी तांदूळ महोत्सवात अन्य उत्पादनेही ग्राहकांसाठीआकर्षण असणार आहे. त्यात सेंद्रीय गुळ १० टन, नाचणी १५ व ज्वारी १०० टन आदींचा समावेश आहे. तांदूळ महोत्सवात ग्राहकांना उत्तम गुणवत्तेचा व खात्रीशीर तांदूळ रास्त भावात मिळाल्याने गतवर्षीच्या महोत्सवाबाबत समाधानी असल्याच्या प्रतिक्रिया हजारो ग्राहकांनी नोंदविल्या होत्या. शेतकरी ते ग्राहक थेट समन्वयासाठी, शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचा हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त सिध्द होणार आहे. तरी उत्पादक व ग्राहकांना या तांदूळ महोत्सवात सहभागी होण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा