जलसंपदा विभागातील घोटाळेबाजांना पाठीशी घालून मराठवाडय़ावर अन्याय केल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवारी परंडा शहरातील शिवाजी चौकात श्वेतपत्रिकेची होळी करण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
राज्यातील आघाडी सरकार घोटाळेबाजांना पाठीशी घालत आहे. मंत्र्यांचे घोटाळे लपविण्याचा प्रयत्न श्वेतपत्रिकेत केला आहे. घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या मंत्र्यांना क्लीनचीट देऊन भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केल्याचा आरोप भाजपचे प्रदेश चिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी केला. श्वेतपत्रिकेची होळी केल्यानंतर पत्रकार परिषदेत ठाकूर पुढे म्हणाले की, श्वेतपत्रिकेत प्रस्तावित केलेल्या शिफारशींमुळे मराठवाडय़ावर अन्याय होणार आहे. सरकारवर दबाव आणण्यासाठी व  मराठवाडय़ाच्या न्याय्य हक्काचे पाणी पदरात पाडून घेण्यासाठी हक्काचा २१ टीएमसी प्रकल्प स्थगित करण्याचे श्वेतपत्रिकेत नमूद केले. त्यामुळे श्वेतपत्रिकेचा आम्ही निषेध करून होळी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जलसंपदामंत्री अजित पवार व त्यांचे सहकारी सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यांनी नियम धाब्यावर बसवून ७० हजार कोटींची कामे खिरापतीप्रमाणे वाटली. त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप श्वेतपत्रिकेत कुठेही आढळून येत नाहीत. मराठवाडा सिंचनाच्या बाबतीत इतर भागाच्या तुलनेत मागे आहे. मराठवाडय़ातील केवळ १६ टक्के जमीन सिंचनाखाली आहे. ५३ तालुके कायम अवर्षणग्रस्त आहेत. असे असताना मराठवाडय़ातील जनतेवर अन्याय करून विश्वासघात केला असल्याचा आरोप करून हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करून पाणी न मिळाल्यामुळे या भागाचा विकास खुंटला असल्याचे ठाकूर म्हणाले. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी, तालुका सरचिटणीस अ‍ॅड. संतोष सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष सुखदेव टोपे, शहराध्यक्ष मन्नान बासले, अ‍ॅड. भालचंद्र अवसरे, भालचंद्र खरसडे, संदीप शहा आदी उपस्थित होते.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा