घरोघरी जाऊन वीजबिलांची वसुली करायची असो किंवा एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करायचा असो, मलकापूरच्या अर्बन-१ विभागात या कामांसाठी एकाच व्यक्तीला आवाज दिला जातो. ती व्यक्ती म्हणजे प्रीती बहुरूपी! ‘महावितरण’ने महाराष्ट्रभरातून वायरमन पदासाठी महिलांकडूनही अर्ज मागवल्यानंतर अर्ज केलेल्या पहिल्या काही महिला अर्जदारांपैकी एक प्रीती. मलकापूर तालुक्यातील एका गावात प्रीती सरपंच होती. मात्र ही सरकारी नोकरी मिळाल्यानंतर तिने सरपंचपद नाकारत हक्काची नोकरी स्वीकारली.
रस्त्यावरील ट्रान्सफॉर्मर किंवा विजेचा खांब येथे बिघाड झाल्यास खांबावर चढून दुरुस्ती करणारे वायरमन पाहण्याची सवय असलेल्या मलकापूरला सध्या ही कामे प्रीती करताना पाहण्याचीही सवय झाली आहे. मात्र हा रस्ता सोपा नक्कीच नव्हता. सुरुवातीला अनेकांना एक बाई ही कामे करत असल्याचे पाहून धक्काच बसला. आपल्या विभागातील ज्येष्ठ सहकारीही आपल्याला प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नेण्यास उत्सुक नसायचे, असे प्रीती सांगते.
‘महावितरण’च्या नोकरीत प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन बिघाड दुरुस्त करण्यासाठी मदत करण्याची खूप इच्छा होती. शेवटी माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांचा विश्वास संपादन केला. आमचे अभियंता वासकर यांनीही मला खूपच चांगले मार्गदर्शन केले. त्यांनीच मला कामाच्या ठिकाणी जाण्यास प्रोत्साहन दिले. तेथे गेल्यानंतर पडेल ते काम करण्याची तयारी ठेवली. वीजबिलांची वसुली करण्यापासून संपूर्ण दुरुस्ती करण्यापर्यंत पडतील ती कामे मी करते, असे प्रीती अभिमानाने सांगते.
मलकापूरच्या सिंधी कॉलनीमध्ये मी बिले गोळा करायला जायला लागल्यापासून येथील महिलांचाही माझ्यावर खूपच विश्वास बसला. तुम्ही आलात की, आम्हाला चिंता नसते, असे त्या सांगतात तेव्हा मलाही खूप बरे वाटते. जूनमध्ये मला या नोकरीत वर्ष पूर्ण होईल. या वर्षभरात मी खूप नव्या गोष्टी शिकले आहे. माझा आत्मविश्वास दामदुपटीने वाढला आहे, असे प्रीतीने सांगितले.

Story img Loader