ज्यांच्या फळबागांची, मोसंबी लागवडीची नोंद सात-बारावर आहे, त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या नियमानुसार येत्या १५ दिवसांत हेक्टरी आठ हजार रुपये अनुदान मिळेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
येथील गुरू गणेश भवन परिसरात जिल्ह्य़ातील मोसंबी उत्पादकांचा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी श्याम देशपांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय कृषी सहसंचालक शु. रा. सरदार उपस्थित होते. फळबागा नुकसानभरपाईच्या अनुषंगाने ज्या फळबागांची पैसेवारी पन्नासपेक्षा कमी आहे, त्या शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपये अनुदान वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या मोसंबीसह फळबागांची नोंद सात-बारा उताऱ्यावर आवश्यक आहे.
ही नोंद नसेल तर अनुदान मिळू शकणार नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले. मोसंबी उत्पादकांना राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत द्यावयाच्या ३० हजार रुपयांच्या कर्जाबाबत येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्य़ातील बँकांची बैठक घेऊन कर्जमंजुरीचे निर्णय घेण्याबाबत आदेश द्यावेत, असे सुचविण्यात आल्याचेही टोपे म्हणाले.
या कर्जासाठी डिसेंबर २०१२ पूर्वी शेतकऱ्यांचे प्रस्ताव बँकेकडे जाणे आवश्यक होते. परंतु या वर्षीचा दुष्काळ लक्षात घेता बँकांनी यात सवलत देऊन कर्जाचे अर्ज स्वीकारून मोसंबी उत्पादकांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे आवाहनही टोपे यांनी केले.
मोसंबी व फळबाग नुकसानभरपाईसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करावे, असा प्रस्ताव स्वत: केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे दिला असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा