काढणीपश्चात काही दिवसात नाशवंत होणारी फळे-पालेभाज्या, त्यांचा रंग, सुगंध, पौष्टीक तत्त्व सुरक्षित ठेवून एक वर्षांपर्यंत साठवून ठेवणे संपूर्ण सौरऊर्जेवरील वाळवण यंत्रामुळे आता शक्य आहे. अंबाजोगाईच्या वैभव तिडके व शीतल सोमाणी यांच्या सायन्स फॉर सोसायटीच्या चमूने राज्यभरात १४ ठिकाणी ही यंत्रे बसविली आहेत. साडेतीन हजार रुपये वर्गमीटर या माफक किमतीच्या संशोधनावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील ३५ लाख रुपयांच्या बक्षिसाची मोहोर उमटविली गेली. शेतकऱ्यांना हंगामातील अतिरिक्त फळे भाज्या साठवून अधिक उत्पन्न मिळवून देण्यात हे यंत्र फायदेशीर ठरणार आहे.
शेतीप्रधान देशात शेतीच्या प्रगत तंत्रज्ञानाअभावी दरवर्षी तब्बल ६० लाख दशलक्ष टन फळे-भाजीपाल्याची नासाडी होत असल्याचे एका पाहणीत समोर आले. त्यातून प्रेरणा घेत आपल्या संशोधनाचा शेतकऱ्यांसाठी उपयोग व्हावा, या विचाराने वैभव तिडके व त्यांच्या सहकारी मित्रांनी संशोधन सुरू केले. शेतकऱ्यांसाठी नगदी पसे देणारी फळे व पालेभाज्या जास्त दिवस कशी टिकवता येईल, यावर प्रयत्न झाले. त्यातून संपूर्ण सौरऊर्जेवरील वाळवण यंत्र विकसित झाले.
सध्या बाजारात विजेवर चालणारी वाळवण यंत्रे आहेत. पण ती शेतकऱ्यांना परवडत नाहीत. एक किलो भाजी वाळविण्यासाठी ५० ते १०० रुपये खर्च येतो. त्यामुळे संपूर्ण सौरऊर्जेवरील वाळवण यंत्र शेतकऱ्यांना वरदानच ठरणार आहे. केवळ साडेतीन हजार रुपये प्रतिवर्ग मीटर खर्चात सव्वाशे किलो फळांचे निज़्र्ातुकीकरण करून वाळवण करता येते. एकदा यंत्र विकत घेतल्यानंतर कोणताही अतिरिक्त खर्च नाही. यंत्रामुळे हंगामानंतरही फळे, भाज्या त्यांचा रंग, जीवनसत्त्व सुरक्षित ठेवून एक वर्षांपर्यंत साठवून ठेवणे शक्य झाले आहे. सध्या औरंगाबाद, पाल्रे, सावंतवाडीसह १४ ठिकाणी हे यंत्र बसविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात भाव नसताना माल साठवून ठेवत भाव आल्यास विक्री करणे शक्य होणार आहे. त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल, असा वैभव तिडके यांचा विश्वास आहे. या संशोधनाला नुकतेच आंतरराष्ट्रीय स्पध्रेत तब्बल ३५ लाख रुपयांचे घसघशीत बक्षीस मिळाले. शीतल सोमाणी हिला विशेष सादरीकरणास ५० हजारांचे बक्षीस मिळाले.
जगातील ११० देशांमधील सव्वाशे संशोधकांनी आपले संशोधन सादर केले होते. त्यातून सौर वाळवण यंत्राची निवड झाली. साहजिकच आंतरराष्ट्रीय स्तरावर हे संशोधन यशस्वी मानले गेले आहे. शेतकऱ्यांना पिकलेली फळे व भाज्या काढणीपश्चात जास्त काळ ठेवणे शक्य होत नसल्याने मिळेल त्या भावात विकणे भाग पडते. परिणामी उत्पादन खर्चापेक्षा कमी मोबदला मिळाल्याने शेतीचे अर्थकारण गडबडते. यावर सौर वाळवण यंत्र फायदेशीर ठरणार आहे.
बीड जिल्हय़ातील भोगलवाडी (तालुका धारूर) येथील निवृत्त न्या. बाबुराव तिडके यांचा मुलगा वैभव अंबाजोगाई येथे योगेश्वरी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करून मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीत दाखल झाला. शेतीशी जन्मजात जवळीक असल्याने आपल्या विज्ञानाचा शेतकऱ्यांना उपयोग झाला पाहिजे, या जाणिवेतून हे संशोधन झाल्याचे तो सांगतो. पूर्वीच्या युवडीसीटी सी संलग्न सायन्स फॉर सोसायटी ही संशोधन संस्था स्थापन करून हे यंत्र विकसित केले. या टीममध्ये शीतल सोमाणी या अंबाजोगाईच्याच वर्ग मत्रिणीसमवेत परभणीचा स्वप्नील कोकाटे, तसेच गणेश भोर, तुषार गवारे, अश्विन पावडे, अश्विन गायकवाड, निकीता खैरनार या मुंबईच्याही तरुण संशोधकांचा या टीममध्ये समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा