भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ाच्या विकासासाठी मत्स आणि फळ प्रक्रिया उद्योगांची उभारणी करण्याचे महत्त्वाचे सूतोवाच केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी येथे केले. भंडाऱ्यातील मुंडीपार येथे भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच्या पॉवर इक्विपमेंट फॅब्रिकेशन प्लांटच्या कोनशिला समारंभात पवार बोलत होते. याच कार्यक्रमात बोलताना विदर्भाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल पटेल, राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, खासदार मुकुल वासनिक, मारोतराव कोवासे, गोंदियाचे पालकमंत्री अनिल देशमुख, भंडाऱ्याचे पालकमंत्री रंजीत कांबळे, भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वंदना वंजारी, आमदार गोपालदास अग्रवाल, रामरतन राऊत, अनिल बावनकर, राजेंद्र जैन तसेच माजी आमदार सेवक वाघाये, बंडू सावरबांधे, विलास श्रृंगारपवार, दिलीप बनसोड मनोहरभाई पटेल अकादमीच्याअध्यक्षा वर्षां पटेल, भेलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बी. प्रसाद राव यांच्यासह ओ.पी. भुतानी, एच.पी. दुबे, आर. कृष्णन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
गोंदिया-भंडारा जिल्हयात धानपिकांची वरथेंबी पावसाच्या बिनभरवश्याची शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांच्या मुलांनी अन्य मार्गानी उत्पन्न मिळविणे काळाची गरज आहे.
‘भेल’ प्रकल्पाचे भूमिपूजन साकार झाल्याने नव्या पिढीच्या दृष्टीने उज्जवल भविष्याची निर्मिती होणार आहे. वैनगंगा नदीमुळे जिल्हयात फळबागाची शेती शक्य असून मोठय़ा फळ प्रक्रिया उद्योगांना मोठा वाव आहे. वैनगंगेच्या पात्रात सापडणारा िझगा देशात इतरत्र कोठेही मिळत नाही.
त्यामुळे झिंगा, मत्सबीज आणि फळप्रक्रिया उद्योगांची उभारणी करण्याची दोन्ही जिल्ह्य़ांसाठी मोठी संधी असून त्या दिशेने प्रयत्न केले जातील, असे पवार यांनी सांगितले.
विदर्भ विकासासाठी कटिबद्ध असल्याची प्रारंभीच ग्वाही देऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,  नागपूरच्या ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ औद्योगिक गुंतवणूक परिषदेत भेलच्या अधिकाऱ्यांनी २७ सामंजस्य करार केले होते.
पण, त्यांना आपल्या परिसरात सोयीस्कररित्या जागा मिळवून देण्यापर्यंत प्रफुल पटेलांनी घेतलेल्या पुढाकाराचे फलित म्हणजे आजचा समारंभ आहे.
भेलच्या देशभरातील १७ महत्वपूर्ण कारखान्यापंकी महाराष्टात उभा राहणारा हा पहिला कारखाना आहे.या प्रकल्पाचा दुसरा टप्पा महत्वपूर्ण राहणार आहे. देशात सोलर पॅनलचे पार्ट तयार करण्याचे कारखाने नाहीत.
भेलद्वारे सोलर पॅनलचे चे मुख्य पार्ट तयार करण्याची तयारी केली आहे. नवीन कारखान्यांना विरोध केला जात असेल तर रोजगार कोण निर्माण करणार?, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भेलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रसाद राव यांनी मुंडीपारच्या ग्रीनफील्ड प्रकल्पात ५०० कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याचे सांगितले. मुंडीपार, बामणी आणि खैरी गावातील ४७२ एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जात असून प्रकल्पाची निर्मिती क्षमता सुमारे १ लाख मेट्रिक टन प्रति वर्ष राहील, असे सांगितले. स्वागतपर भाषणात प्रफुल पटेल यांनी गोंदिया-भंडारा जिल्हयात विकासाची गंगा आणण्याचा पुनरुच्चार केला. कार्यक्रमाचे संचालन आमदार राजेंद्र जैन यांनी केले तर भेलचे ओ.पी. भुतानी यांनी मानले.

Story img Loader