शहरात ऐतिहासिक ठरावी अशी कारवाई करीत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सावेडीतील प्रोफेसर कॉलनी रस्त्यावर बेकायदेशीररीत्या बांधण्यात आलेले राजमोती लॉन्स हे आलिशान मंगल कार्यालय आज पूर्णपणे जमीनदोस्त
मनपा आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या आदेशानुसार निवडक संबंधितांनाच कल्पना देऊन कमालीची गुप्तता पाळत मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सुमारे दोन एकर भूखंडावरील हे मोठे व आलिशान बांधकाम आज पूर्णपणे पाडून टाकले. सकाळी ८ वाजता मोठय़ा पोलीस फौजफाटय़ासह तीन जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने ही धडक कारवाई करण्यात आली. राजमोती लॉन्सचे संचालक पंडितराव खरपुडे व त्यांच्या मुलांनी काही तरुणांच्या मदतीने कारवाईत अडथळे आणण्याचा प्रयत्न तर केलाच, शिवाय अनपेक्षितपणे सुरू झालेल्या या कारवाईची माहिती मिळताच मनपा अधिकाऱ्यांवर मोठा राजकीय दबाव आणण्याचाही प्रयत्न झाल्याचे समजते. मात्र त्याचीही तमा न बाळगता ही कारवाई करण्यात आली. मनपाच्या अधिकाऱ्यांनी यादरम्यान तीन तास मोबाइल फोनही बंद करून टाकले होते. मोहीम फत्ते झाल्यानंतरच ते सुरू करण्यात आले.
मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने चारच दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या सोमवारी (दि. १०) या आलिशान मंगल कार्यालयाचे दर्शनी भागातील बेकायदेशीर बांधकाम पाडून टाकले होते. मात्र अन्य बांधकाम स्वत: पाडून टाकण्याची तसेच कारवाईत कोणताही अडथळा न आणण्याचे प्रतिज्ञापत्र मंगल कार्यालयाचे संचालक खरपुडे यांनी दिल्याने त्या वेळी तेवढय़ावर ही कारवाई थांबवली. मात्र खरपुडे यांनी जागामालक महेंद्र लोढा यांना पुढे करून त्यांच्यामार्फत काल (गुरुवार) न्यायालयात दावा दाखल केला. त्याची सुनावणी उद्या (शनिवार) होणार आहे. मात्र तत्पूर्वी आजच मनपाने ही धाडसी कारवाई केली. दरम्यान, खरपुडे यांचा पूर्वानुभव लक्षात घेता मनपाने कारवाईला सुरुवात करण्यापूर्वी मेमध्येच न्यायालयात कॅव्हेट दाखल करून ठेवले आहे.
सावेडीतील प्रोफेसर कॉलनीसारख्या मोक्याच्या परिसरात याच रस्त्यावर अलीकडेच बांधलेले राजमोती लॉन्स हे आलिशान मंगल कार्यालय पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मूळ जागा लोढा कुटुंबाची असून खरपुडे यांनी कराराने ही जागा घेऊन मंगल कार्यालय बांधले आहे. मात्र ते बांधताना मनपाचे सर्वच नियम ‘वेशीवर’ टांगण्यात आले. सुमारे दोन एकर जागेवरील या आलिशान मंगल कार्यालयाचा त्याचा सगळाच मामला बेकायदेशीर होता. मिळालेल्या माहितीनुसार हा भूखंड बिगरशेती झालेला नाही. त्यामुळे कोणतीच परवानगी न घेताच हे मंगल कार्यालय बांधण्यात आले. त्याचा व्यावसायिक वापर करताना ‘सेटबॅक’ तर नव्हताच, मात्र रस्त्याला खेटूनच मोठे बांधकाम करण्यात आले होते, त्याला वाहनतळही नव्हता. बिनदिक्कतपणे हे बांधकाम करण्यात आले. विशेष म्हणजे एवढे मोठे बांधकाम सुरू असताना मनपाचा संबंधित विभाग, या भागाचे नगरसेवक, पदाधिकारी अशा सर्वानीच त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर मात्र त्याची दखल घेण्यात आली.
लोकांच्या तक्रारी आल्याने हे बांधकाम झाल्यानंतर मनपाने त्याची पाहणी करून मंगल कार्यालय पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे घोषित केले होते. त्यानुसार संबंधितांना नोटीस देऊन १५ दिवसांत म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले होते. त्याची सुनवणीही घेण्यात आली, मात्र यातील कोणत्याच गोष्टीला प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर आठ दिवसांपूर्वी मनपाने या कारवाईला सुरुवात केली. त्याचा आज यशस्वी समारोप करण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा