ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या अद्भूत प्रतिभाविष्कारातून साकारलेले गीत रामायण हे अवघ्या महाराष्ट्राचे आधुनिक सांस्कृतिक संचित आहे. बाबूजींच्या कंठातून प्रत्यक्ष गीत रामायण ऐकणे हा भाग्ययोगच असे. परंतु आता त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र श्रीधर फडके यांच्या मुखातून गीत रामायण ऐकण्याची संधी बोरिवलीकरांना उपलब्ध झाली आहे. बोरिवली (प.) येथील सावरकर उद्यानामध्ये रामनवमीपासून तीन दिवस (शुक्रवार, १९ ते रविवार २१ एप्रिल) गीतरामायण सादर होणार असून रसिकांना ते विनामूल्य अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
जनसेवा केंद्र, बोरिवली या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. शुक्रवार, शनिवार व रविवारी सायंकाळी ६ ते १० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. गीत रामायणातील गीतांबरोबरच बाबूजींनी संगीतबद्ध केलेल्या, अवीट गोडीच्या अन्य काही गीतांचीही मेजवानी रसिकांना या कार्यक्रमात मिळणार आहे. कार्यक्रमाचे निरुपण धनश्री लेले करणार आहेत. रसिकांनी या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जनसेवा केंद्राचे कार्यवाह जनार्दन कामत यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा