मार्च अखेरीच्या जंजाळातून मुक्त झाल्यानंतर ‘एप्रिल फुल’चा आनंद एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी घेतला जातो. पण आता संपूर्ण महिनाभर आनंद मिळणार असून एप्रिल हा उत्सवाने फुल्ल भरलेला आहे. त्यामुळे एप्रिल फुल नव्हे तर ‘एप्रिल उत्सव फुल्ल’ बनणार आहे.
मार्च अखेरीपासून उत्सवांना सुरूवात होत आहे. उद्या मंगळवार दि. २६ रोजी होळी, बुधवार दि. २७ रोजी धूलीवंदन, शुक्रवार दि. २९ रोजी गुडफ्रायडे व तुकाराम बीज, शनिवार दि. ३० रोजी शिवजयंती (तिथीनुसार), रविवार दि. ३१ रोजी रंगपंचमी व इस्टर संडे आहे. सोमवार दि. १ हा एप्रिल फुलचा दिवस असून या दिवशी नाथ षष्टी आहे. षष्टीनिमित्त भाविकांच्या दिंडय़ा पैठणकडे निघाल्या असून परिवहन खात्याने जादा बसगाडय़ा सोडल्या आहेत. गुरुवार दि. ११ रोजी गुढीपाडवा, शुक्रवार दि. १२ रोजी अक्कलकोट स्वामी प्रकट दिन, रविवार दि. १४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. मंगळवार दि. १६, ते गुरूवार दि. १८ पर्यंत श्रीरामपरचा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेला सय्यद बाबाचा उरूस आहे. शुक्रवार दि. १९ रोजी रामनवमी असून शहरात रविवार दि. २१ पर्यंत यात्रेचे कार्यक्रम चालणार आहेत. मंगळवार दि. २३ रोजी महावीर जयंती गुरूवार दि. २५ रोजी हनुमान जयंती व छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी, कार्यक्रम आहे. दि. १ मे ला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर उत्सवाचे भरते कमी होईल.
यंदा दुष्काळी परिस्थिती असली तरी गावोगाव हरिनाम सप्ताह मात्र धूमधडाक्यात सुरू आहेत. तुकाराम बीजेनिमित्त अनेक गावात सप्ताह सुरू आहेत. दुष्काळ असला तरी उत्सवांचा सुकाळ असून त्यावर पाण्यासारखा पैसा खर्च होत आहे. आनंदाचाही महापूर येण्यास प्रारंभ झाला आहे. उत्सवामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, उत्सव शांततेत व आनंदात पार पडावेत यासाठी प्रियदर्शिनी मंगल कार्यालयात आज अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता ठाकरे-साळुंके व प्रांताधिकारी सुहास मापारी यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा