जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागातील सात तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याचे मान्य करीत राज्याचे सहकार आयुक्त राजगोपाल देवरा यांनी मात्र उपाययोजनांमध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही, त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही दिली. जिल्ह्य़ाचे पालकसचिव नितीन करीर सध्या रजेवर आहेत. त्यामुळे देवरा यांच्यावर तुर्त ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी आज येथे खातेप्रमुखांच्या बैठकीत दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना देवरा म्हणाले, जिल्ह्य़ात दुष्काळ नियोजनाचे काम प्रभावीपणे सुरू आहे. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा याचे नियोजन करण्यात आले आहे. पाण्याचे स्त्रोत शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शक्य तेवढय़ा जवळ पाणी उपल्बध् करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. पुरेसे टँकर या काळात उपलब्ध करून देण्यात येतील. या सर्व गोष्टींना निधी कमी पडणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाईल.
जिल्ह्य़ात चाऱ्याची मोठी कमतरता असुन बाहेरच्या जिल्ह्य़ातून चारा आणण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. साधारणपणे फेब्रुवारीत राज्यातील साखर कारखाने बंद होतील. त्यानंतर ऊसाची उपलब्धताही संपलेली असेल. त्यामुळेच बाहेरच्या जिल्ह्य़ातून चारा आणावा लागणार आहे. त्यादृष्टीने संबंधित सर्वच खात्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात आत्तापर्यंत ६६ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले असुन ५८ लाख पोते साखरेची निर्मिती झाली आहे. राज्यात अजुनही ५४५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे अशी माहिती देवरा यांनी दिली.
जिल्हा बँकांच्या निवडणुका नव्या रचनेनुसार
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला मुदतवाढ देण्याचा सध्या कुठलाच प्रस्ताव नाही, मात्र सहकार कायद्यात बदल होत आहेत. या बदलात जिल्हा बँकांच्या संचालक मंडळाच्या रचनेतही बदल होणार आहेत. हे विधेयक विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात मांडण्यात येणार असुन या बदलानुसारच जिल्हा बँकेच्या निवडणुका घेतल्या जातील असे सांगत या विषयावर अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.