राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत २०१२-१३मध्ये जिल्हय़ातील ५ तालुक्यांत १२२ कामांचे उद्दिष्ट होते. त्यासाठी ९ कोटी ९१ लाख १७ हजारांचा निधी प्राप्त झाला. डिसेंबरअखेर २२ कामांचे उद्दिष्ट साध्य होऊन ३ कोटी १० लाख २५ हजार खर्च झाला. मार्चअखेर किती कामे पूर्ण होणार, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात कळमनुरी तालुक्यातील मंजूर २६पैकी ४, सेनगाव २२पैकी ३, हिंगोली १८पैकी ३, वसमत ३३पैकी ७, औंढा नागनाथ २३पैकी ५ याप्रमाणे जिल्हय़ात १२२पैकी फक्त २२ कामांचे उद्दिष्ट साध्य झाले. या कामांसाठी ९ कोटी ९१ लाख १७ हजारांचा निधी प्राप्त झाला असताना फक्त ३ कोटी १० लाख २५ हजार रुपये खर्च झाल्याची नोंद शासनदरबारी आहे. मार्च महिना जवळ आला असताना २०१२-१३पर्यंत १२२ कामांचे उद्दिष्ट लक्षात घेता अजून ३२ कामे सुरूच झाली नाहीत, तर टप्पा एकमध्ये ४४, टप्पा दोनमध्ये १३ व टप्पा तीनमध्ये ११ कामे करण्याचे नियोजन आहे. हे पूर्ण होणार किंवा नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामीण पाणीटंचाई निवारणार्थ ऑक्टोबर २०१२ ते जून २०१३पर्यंत तयार केलेल्या संभाव्य कृती आराखडय़ात १ हजार ८५४ उपाययोजनांमध्ये नवीन विंधन विहिरी, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरीची दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळयोजना, टँकरने पाणीपुरवठा, विहिरी अधिग्रहण करणे, गाळ काढणे याकरिता १ हजार ३३१ गावांमध्ये १० कोटी ७३ लाख ३ हजार रुपये खर्चाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
 मागील वर्षांत ४७२ गावांमध्ये २ कोटी ३४ लाख ५४ हजार खर्च झाला. १ कोटी ९९ लाख निधी जि.प.कडे वर्ग केला, तर दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने प्राप्त झालेला २५ लाखांचा निधी जि.प.कडे वर्ग केला.