उजनी पाणीपुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ ऑक्टोबरला ५१ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. दोन महिने उलटल्यानंतरही या निधीचे भिजत घोंगडे कायम आहे. त्याचबरोबर पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून मागणी करण्यात आलेले ५ कोटी रुपयेदेखील अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे उजनी योजनेबरोबरच टँकरने सुरू असलेला पाणीपुरवठादेखील अडचणीत आला आहे. मागील २५ दिवसांपासून पालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. त्यातच आता टँकरही बंद झाल्यास उस्मानाबादकरांचा पाणी प्रश्न गंभीर होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी उस्मानाबादेत निधी जाहीर केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत काम पूर्ण करा, असे निर्देशही दिले होते. दोन महिने उलटून गेले तरीदेखील अद्याप रक्कम उपलब्ध झालेली नाही. निधी उपलब्ध झाल्यानंतर काम पूर्ण होण्यासाठी किमान महिन्याभराचा कालावधी लागणार आहे. गेल्या वर्षांपासून उस्मानाबाद शहराची पाणी समस्या गंभीर बनलेली आहे. यंदाच्या पावसाळय़ात सरासरीच्या निम्मादेखील पाऊस झालेला नसल्याने उन्हाळय़ात पाणीप्रश्न अधिक बिकट होणार आहे. त्यामुळे नागरिकांचे डोळे उजनी पाणीपुरवठा योजनेकडे लागलेले आहेत. मात्र निधीचा प्रश्न निर्माण झाल्याने उन्हाळय़ात तरी उजनीचे पाणी मिळणार की नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
सध्या शहराला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आजपर्यंत केलेला आणि यापुढे करावा लागणारा पाणीपुरवठा ध्यानात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ५ कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केलेली आहे. ती रक्कम उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे शहरातील टँकर बंद होण्याची शक्यता आहे. एकीकडे पाण्याचे सर्व स्रोत आटले आहेत.     

Story img Loader