शिर्डी येथे देश-विदेशातील भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, २०१८ मध्ये श्री साईंच्या समाधीला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत.हा शताब्दी सोहळा मोठय़ा प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. तसेच नजिकच्या काळात नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने या कालावधीत सात ते आठ कोटी भाविक शिर्डीत येतील असा अंदाज आहे. या गोष्टी लक्षात घेऊन स्वतंत्र समिती स्थापन करून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांच्याच अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे.
विखे यांनी नुकतेच चव्हाण यांना याबाबतचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी येथे भविष्यात कोटय़वधींच्या संख्येने दाखल होणाऱ्या भाविकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नगर पंचायत व साई संस्थानकडे पुरेसा निधी नाही. शिर्डी हे केवळ राज्यातील भाविकांचेच नव्हे, तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून मान्यता पावलेले आहे. भाविकांसाठी निवास व्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता गृह, विद्युतीकरण, करमणुकीची साधने, बागबगीचा, इत्यादी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कुंभमेळा यात्रा विकास निधी व नांदेड येथील श्रीगुरुतागद्दी त्रिशताब्दी निमित्त करण्यात आलेल्या विकासकामांच्या धर्तीवर शिर्डी यात्रा स्थानाचा विकास करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे.
शिर्डी शहराचे क्षेत्रफळ अत्यंत कमी असून, आगामी कालावधीतील मोठय़ा गर्दीसाठी करावयाच्या विकास कामांसाठी सुयोग्य विकास आराखडा तयार करुन केंद्र व राज्य शासनाचा निधी प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आदी विदेशातील भक्तांकडूनही निधी प्राप्त होवू शकतो. ही बाब निदर्शनास आणून देत यापुर्वीही विदेशातील साईभक्तांनी शिर्डी विकासासाठी निधी देण्याबाबत स्वारस्य
दाखविल्याचे म्हटले आहे. सुयोग्य व नियोजनबद्ध योजनांची स्पष्टता दर्शवणारा आराखडा तयार करुन त्याचा रोड शो आयोजित केल्यास विदेशातील भाविकांना आकर्षति करता येऊ शकेल असा प्रस्ताव विखे यांनी निवेदनात दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा