पुणे शहरातील नागरिकांच्या काही कार्यक्रमांसाठी तसेच शहरातील आपद्प्रसंगी वापरण्यासाठी उभा करण्यात आलेला महापौर निधी महापौर वैशाली बनकर यांनी स्वत:च्याच प्रभागात वळवल्याचा प्रकार समोर आला आहे. अशाप्रकारे महापौर निधीचा वापर महापौर स्वत:च्या प्रभागातील एखाद्या कामासाठी कसा करू शकतात आणि प्रशासन अशा प्रकारांना साथ देणार का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
महापौर वैशाली बनकर यांच्या प्रभाक क्रमांक ४४ अ मध्ये एका शाळेच्या वाढीव मजल्यांचे बांधकाम केले जाणार असून त्यासाठी पाच कोटी १९ लाख ९० हजार रुपये खर्च येणार आहे. त्यातील एक कोटी ६५ लाख रुपये महापौर निधीतून या कामासाठी वळवण्यात येणार आहेत. तसा विषय स्थायी समितीनेही नुकताच मंजूर केला. हडपसर सर्वेक्षण क्रमांक १६, १७, १८ येथे ही शाळा व क्रीडा संकुल उभे केले जाणार असून त्यासाठी महापौर निधीचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निधी कशासाठी आहे?
महापौर निधीसाठी दरवर्षी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद केली जाते. यंदा सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील कार्यक्रमांना पुणेकरांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिल्यानंतर महापौरांना शहरातील एखाद्या योजनेसाठी वा कामासाठी आयोजक संस्थेकडून काही प्रसंगी रोख निधी दिला जातो. अशा रकमांमधून तसेच काही देणग्यांमधून महापौर निधी उभा राहिला असून पुढे अंदाजपत्रकातच त्यासाठी तरतूद सुरू झाली.
शहरात काही आपद्प्रसंग उद्भवला किंवा नागरिकांना काहीवेळा तातडीची मदत जाहीर करण्याची वेळ आली, तर महापौर निधीतून नागरिकांना मदत दिली जाते. त्याची घोषणा महापौर करतात. तसेच देश-विदेशातील शिष्टमंडळे वा संस्था भेटीसाठी आल्यानंतर त्यांच्या कामांना काही प्रसंगी निधी द्यावा लागतो. काही कार्यक्रम केले जातात. त्यासाठी महापौर निधीचा वापर केला जातो. या निधीच्या वापराचे हे संकेत असताना महापौरांनी मात्र त्यांच्या प्रभागातील शाळेसाठी हा निधी वापरला असून महापौर निधीतून असे बांधकाम करण्याबाबत प्रशासन काय भूमिका घेणार अशीही विचारणा आता होत आहे.
दरम्यान महापौरांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हडपसर भागात विकासकामे होणे तसेच शाळेचे काम होणे आवश्यक असल्याने महापौर निधी वापरला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा