शहरात पुन्हा टोल आकारणी सुरू होणार असल्याची कुणकुण लागल्याने ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यासह टोलविरोधी कृती समितीच्या सदस्यांनी मंगळवारी शहरातील टोल नाक्यांवर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. एकाही टोल नाक्यावर वसुली सुरू नसल्याचे दिसून आले तरी त्यांनी बराच काळ टोल नाक्यांवरील स्थितीचे अवलोकन केले. पुन्हा टोल सुरू करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याबद्दल कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आयआरबी कंपनीचे श्राद्ध घातले.
शहरातील टोल आकारणीस जोरदार विरोध दर्शवत रविवारी सर्व टोल नाक्यांची नासधूस करण्यात आली होती. स्थानिक मंत्र्यांनी वैयक्तिक पातळीवर टोल आकारणी होणार नाही, याची हमी दिली होती. तथापि सोमवारी रात्री आयआरबी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांची भेट घेऊन टोल सुरू करण्यासाठी संरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती. याची माहिती मिळाल्यानंतर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ज्योतिप्रिया सिंग यांची भेट घेऊन टोल वसुलीकरिता आयआरबी कंपनीला पोलीस बंदोबस्त देऊ असे आवाहन केले होते. रस्ते प्रकल्पासाठी आयआरबीने केलेल्या रक्कम भागवण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. कामगारमंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आयआरबीच्या प्रशासनाला टोल रद्द करीत असल्याचे पत्र दिले आहे. टोलविरोधात लोकभावना भडकल्या असून त्याचा पुन्हा उद्रेक होऊ नये याकरिता पोलिसांनी टोल वसुली कशी थांबेल याचा विचार करावा असे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंत वेगवेगळय़ा हालचाली सुरू होत्या.
रात्रीच्या घडामोडीच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी पुन्हा टोल सुरू होणार का याची शंका कृती समितीच्या कार्यकर्त्यांना भेडसावू लागली होती. जनउद्रेकामुळे टोल नाके उद्ध्वस्त झाले तरी तेथे टेबल-खुर्ची टाकून टोल वसुली सुरू करण्याची भूमिका आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे प्रत्यक्षात तसे काही होते का याची पाहणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे,बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, रमेश पवार, सुभाष देसाई, रमेश मोरे, गजानन यादव आदींनी शिरोली टोल नाक्याला भेट दिली. या टोल नाक्यावर टोल वसुली सुरू नसल्याचे दिसून आले. तथापि पुन्हा टोल वसुलीचा प्रयत्न झाल्याच्या निषेधार्थ कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आयआरबी कंपनीचे प्रतीकात्मक श्राद्ध घातले. तसेच आयआरबी कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र म्हैसकर यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. यानंतर शाहू, आर. के. नगर, शिये, उचगाव, सरनोबतवाडी आदी टोल नाक्यांवर जाऊन कार्यकर्त्यांनी पाहणी केली. तेथे ना टोल वसुली सुरू होती ना त्याबाबतची कसलीही यंत्रणा. तथापि पोलीस बंदोबस्त मात्र तैनात करण्यात आला होता. टोल वसुलीसाठी काही कर्मचारी जमले होते, पण कृती समितीचे कार्यकर्ते आल्याचे पाहून त्यांनी तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, रविवारी झालेल्या टोल नाक्यांच्या तोडफोडीत सात टोल नाक्यांचे १ कोटी २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार आयआरबीच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. त्याची खातरजमा पोलिसांकडून केली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. तर टोल नाक्यांवर घडलेला प्रकार म्हणजे लोकांचा उद्रेक होता असा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला पाठवला आहे. टोल विरोधात लोकांत असंतोष असून शहरातील वातावरण तणावाखाली असल्याचे अहवालात म्हटले आहे.
आंदोलकांकडून ‘आयआरबी’चे श्राद्ध
शहरात पुन्हा टोल आकारणी सुरू होणार असल्याची कुणकुण लागल्याने ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यासह टोलविरोधी कृती समितीच्या सदस्यांनी मंगळवारी शहरातील टोल नाक्यांवर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. पुन्हा टोल सुरू करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याबद्दल कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आयआरबी कंपनीचे श्राद्ध घातले.
First published on: 15-01-2014 at 03:12 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funeral rites of rbi from the agitator