खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों..अशी चित्रपटातून कितीही गाणी म्हटली तरी स्टार कलाकारांना असे खुल्लम खुल्ला प्रेम करणे परवडत नाही. मग लपत छपतच कधी जागा बदलत, कधी वेळा बदलत प्रेमाचा सिलसिला सुरू ठेवावा लागतो. सध्या पडद्यावर आणि पडद्याबाहेर दोन्हीकडे चर्चेत असलेल्या रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या प्रेमाचीही अशीच गोची झाली आहे. या दोघांनाही प्रेमाच्या गुजगोष्टी करायला वेळेची, जागेची गणिते जमवणे अवघड झाले आहे. त्यामुळे प्रेमाचा मामला ‘सेट’ करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र चित्रपटात काम करण्याचा निर्णय या जोडगोळीने घेतला आहे. प्रेमकथांचा मास्टर दिग्दर्शक इम्तियाज अली त्यांच्या मदतीला धावला आहे.
रणबीर आणि कतरिनाची मोठी अडचण म्हणजे त्यांनी आपले प्रेम आजपावेतो जाहीर केलेले नाही. पण, कतरिनाच्या चित्रिकरणाला रणबीरने स्वित्र्झलडला सुट्टीसाठी जायचे, कधी रात्री उशीरा प्रसिद्धीमाध्यमांना गुंगारा देत दोघांनी एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पहायचा, असे सव्यापसव्य त्यांना करावे लागते. प्रेमात पडल्यापासून या दोघांनी नवीन वर्षांची पूर्वसंध्या न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर एकत्र फिरण्यात घालवली आहे. या सगळ्या लपंडावामुळे त्यांच्या प्रेमाचा बहर सगळ्यांपर्यंत पोहोचला आहे. पण, या दोघांना मात्र जाहीरपणे फिरायची अडचण झाली आहे.
त्यातच ‘रॉकस्टार’, ‘बर्फी’च्या यशानंतर रणबीरकडे चित्रपटांची रांग लागली आहे. बरे त्याचे बरेचसे चित्रपट हे इकडच्या कथानकांवर असल्याने तो भारतात तर यशराजच्या ‘धूम’मुळे कतरिना सतत परदेशी अशी स्थिती असल्याने दोघांना एकमेकांसाठी वेळ मिळत नाही आहे. या सगळ्या अडचणींवर हमखास उपाय म्हणून या दोघांनी एकत्र चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून चित्रिकरणाचे दिवस तरी कोणतेही टेन्शन न घेता एकत्र घालवता येतील. राजकुमार संतोषींच्या ‘अजब प्रेम की गजब कहानी’ चित्रपटातून ही जोडी पडद्यावर एकत्र आली होती. तेव्हापासूनच त्यांच्याही प्रेमाची गोष्ट सुरू झाली असे म्हणतात. त्यानंतर ‘राजनीती’मध्ये त्यांनी एकत्र काम केले होते. आता इम्तियाजला खरोखरच एखादी चांगली प्रेमकथा सापडली असेल तर या जोडीच्या लव्हस्टोरीलाही फुलायला आणखी वेळ मिळेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा