राहुरी तालुक्यात वाळूतस्करांनी हैदोस घातला आहे. बुधवारी रात्री बारागावनांदूर येथे वाळूतस्कराच्या दोन गटांत धुमश्चक्री झाली. तस्करांनी एक वाळू वाहतूक करणारी मालमोटार व दुचाकी पेटवून दिली. राहुरी पोलीस ठाण्यात मात्र याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला नाही.
मुळा नदीपात्रातून वाळूची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत आहे. महसूल, पोलीस व परिवहन खात्याच्या अधिका-यांना वाळूतस्कर मोठय़ा प्रमाणात हप्ते देत आहेत, तसेच त्यांना राजकीय नेत्यांचा वरदहस्त आहे. त्यामुळे या वाळूतस्करांवर कुठलीही कारवाई होत नाही. मध्यंतरी महसूल खात्याच्या अधिका-यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र या गुन्ह्यातील आरोपीवर कारवाई झाली नाही. काल रात्री मुळा नदीपात्रातून बारागावनांदूर येथून वाळू वाहतूक करणा-या तस्करांमध्ये संघर्ष झाला. रात्री ९.३० वाजता एका तस्कराचा वाळूची मालमोटार वाळू भरून निघाली होती. ही मोटार दुस-या गटाने अडवली. त्यावरून तस्करांच्या दोन गटांत वादावादी झाली. या वेळी एका गटाने मालमोटार पेटवून दिली. ही मालमोटार विझविण्याकरिता पालिकेचा अग्निशामक दलाचा बंब मागविण्यात आला होता. त्यावरही तस्करांनी दगडफेक केली. एकमेकांना शिवीगाळ करीत तस्कर एकमेकांना भिडले. त्या वेळी त्यांनी एक दुचाकीही पेटवून दिली. काही राजकीय नेत्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. मालमोटारीतील वाळूतस्करांनी खाली केली. नंतर मोटार हलवण्यात आली. मिटवामिटवी झाल्यानंतर पोलीस आले.
राहुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परमार यांनी बारागाव नांदूर येथे वाळूतस्करांमध्ये हाणामा-या झाल्या. एक मालमोटार पेटवून देण्यात आली, पण पोलिसांकडे कुणीही फिर्याद नोंदविली नाही असे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
मुळा व गोदावरी नदीतून वाळूची मोठय़ा प्रमाणात तस्करी केली जाते. पोलीस ठाण्यासमोरून रात्री वाळू वाहतूक होते. टोलनाक्यावर वाळू वाहतूक करणा-या मालमोटारींचे छायाचित्रण होते, पण अद्याप एकाही मालमोटारीवर  पोलिसांनी कारवाई केलेली नाही.

Story img Loader