कांदा उत्पादक व व्यापाऱ्यांशी चर्चा करत, लिलाव पध्दतीची पाहणी करत भविष्यात देशातील कांद्याची स्थिती काय राहील, हे  भारतीय कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव सिराज हुसेन यांनी येथील बाजार समितीस भेट देऊन समजून घेतले. समितीच्या पदाधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली.
या हंगामात पाऊस कमी झाल्याने भविष्यात कांद्याचे उत्पादन व भावाची काय परिस्थिती राहील, तसेच कांदा उत्पादकाला आवारात मिळणारा भाव व तोच कांदा सामान्य ग्राहकांपर्यंत पोहचेपर्यंतचा भाव यामधील तफावत, मध्यस्थाचा असलेला विळखा कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, त्या अनुषंगाने कृषी कायद्यात काही बदल करता येईल काय, जेणेकरून उत्पादकाला आपल्या मालाचा योग्य मोबदला मिळेल व सामान्य ग्राहकालाही तो परवेडल, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या उद्देशाने हुसेन यांनी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. या प्रसंगी राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन फेडरेशनचे संचालक आर. पी. गुप्ता, सहसंचालक एस. आर. भोंडे, कृषी सहसंचालक ज्ञानदेव काळाणे, कृषी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे, कृषी उपसंचालक गंगाधर मुसमाडे, तालुका कृषी अधिकारी सुरेश गाडे हे उपस्थित होते.
हुसेन यांचे बाजार समिती भेटीप्रसंगी सभापती जयदत्त होळकर यांनी स्वागत केले. नाफेडचे ज्येष्ठ संचालक चांगदेवराव होळकर, सभापती होळकर, सचिव बी. वाय. होळकर यांच्याशी चर्चा करून कांदा, धान्य, द्राक्ष, डाळिंब या शेतमालाचा लिलाव, विक्री संदर्भात चर्चा केली. त्यानंतर कांद्याच्या उघड लिलावात जाऊन लिलाव पद्धती समजावून घेत कांदा उत्पादकांशी चर्चा केली. त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. तसेच कांदा व्यापाऱ्यांशी चर्चा करून भविष्यात कांदा परिस्थिती काय राहील याची माहिती घेतली. कांदा खळ्यावर कांदा प्रतवारीची पाहणी केली तसेच एनएचआरडीएफच्या कांदा बियाणे निर्मिती केंद्रास भेट दिली. यावेळी बाजार समिती सदस्य दिलीप गायकवाड, ओमप्रकाश राका, व्यापारी, शेतकरी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा