नाबार्ड स्वयंसाहाय्यता बचत गट बँक जोडणी कार्यक्रमांतर्गत २०१०-११ या वर्षांत गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २,४८२ बचत गटांना १४ कोटींचे कर्जवाटप केले व ग्रामीण भागातील कुटुंबांपैकी ६५ टक्के ग्रामीण कुटुंबांना मदतीचा हात दिला. अतिदुर्गम व संवेदनशील भागात बँक करत असलेल्या योगदानाबद्दल नाबार्डने स्वयंसाहाय्यता बचत गट बँक लिंकेज कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रेणीत गडचिरोली जिल्हा बँकेला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे येथील जिल्हा बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित एका विशेष समारंभात नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक एम.व्ही. अशोक यांच्या उपस्थितीत पोस्ट मास्टर जनरल कर्नल के.सी. मिश्रा यांच्या हस्ते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.पी. आयलवार यांनी पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक एम.व्ही. अशोक म्हणाले की, दुर्गम व अतिसंवेदनशील अशा गडचिरोली जिल्ह्य़ात बँकेने बचत गटांसाठी उत्कृष्ट कार्य केले आहे. बँकेकडे सद्यस्थितीत ८५०० गट आहेत. सोबतच सामाजिक बांधीलकी जपण्याचे कामही गडचिरोली जिल्हा बँक करीत आहे. ही कौतुकास्पद बाब आहे.
या कार्यक्रमाला नाबार्डचे महाव्यवस्थापक डॉ. पी.एन. घोले, उपमहाव्यवस्थापक एम.पी. चांदेकर, बँकेच्या वतीने पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले साहाय्यक व्यवस्थापक आर.वाय. सोरते, निरीक्षक के.के. सांबरे, योगिनी महाडोळे उपस्थित होते. नाबार्डतर्फे बँकेला सलग २००१-०२ पासून ते आतापर्यंत पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष डॉ. बळवंत लाकडे, मानद सचिव त्रियुगीनारायण दुबे, व्यवस्थापक अरुण निंबेकर यांनी बँकेचे अभिनंदन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा