नागपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या महामंत्रीपदी अरविंद गजभिये, योगेश वाडीभस्मे आणि प्रेम झाडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच संपूर्ण कार्यकारिणी १५ दिवसांत जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
तीन वर्षांसाठी नवनियुक्त महामंत्र्यांचा कार्यकाळ राहणार असून पुढच्या टप्प्यात उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, मंत्री आणि कार्यकारिणी सदस्यांची घोषणा करण्यात येईल. जिल्हा कार्यकर्त्यांचे संमेलन घेण्यात येईल आणि त्या विविध आघाडय़ांचे अध्यक्ष व महामंत्री यांची घोषणा करण्यात येईल, असेही डॉ. राजीव पोतदार यांनी सांगितले.
मागील २५ वर्षांपासून अरविंद गजभिये राजकारणात सक्रिय आहेत. २००६ ते २००९ पर्यंत पर्यंत जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष होते आणि २००९ ते २०१२ याकाळात  त्यांनी महामंत्री पदाचाही कार्यभार त्यांनी सांभाळला. योगेश वाडीभस्मे यांचा ग्रामीण भागात चांगला संपर्क आहे. दोन वेळा नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य होते. भाजयुमोचे ते नागपूर जिल्हाध्यक्ष, रामटेक विधानसभा संपर्क प्रमुख आदी जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.
वाडी क्षेत्रात २० वर्षांपासून भाजपाचे कार्य करत असलेले प्रेम झाडे हे अतिशय लोकप्रिय कार्यकर्ते आहेत. २००६ ते २०१२ या काळात भाजपा वाडी मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्य करून पक्ष संघटना मजबूत केली आहे. आमदार देवेंद्र फडणवीस, डॉ. उपेंद्र कोठेकर, श्रीकांत देशपांडे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच निवड केली, असेही डॉ. राजीव पोतदार यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा