तंटामुक्त पुरस्कारांचे वितरण
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ग्राम विकासाचे स्वप्न पाहिले होते. खेडय़ातील माणसाचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास घडून येईल, हे जाणून खेडय़ाकडे परत चला, असा नारा दिला. महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करून ग्रामीण भागाच्या विकासासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीला पाणी उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करून या परिसराचा विकास घडवून आणू, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केले.
गोंदिया तालुक्याच्या धापेवाडा येथे आयोजित महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार वितरण व नवनिर्मित ग्रामपंचायत भवन व व्यापारी संकुलच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी पटेल बोलत होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेंद्र जैन, तर अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीप बंसोड उपस्थित होते. याप्रसंगी पटेल यांच्या हस्ते महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्काराचे वितरण व नवनिर्मित ग्रामपंचायत व व्यापारी संकुलचे लोकार्पण करण्यात आले. दुबार पीक घेता आले तरच शेतकऱ्यांच्या विकासाला गती मिळेल, हे जाणून आपण धापेवाडा सिंचन प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. या प्रकल्पामुळे या परिसराचे चित्र बदलवून शेतकरी सुखी, समाधानी होणार आहे, असे पटेल म्हणाले.
यावेळी पटेल यांच्या हस्ते कन्या जन्मानंद भेट, माहेर भेट, दारिद्रय़रेषेखालील विद्यार्थी, व्यसनमुक्त झालेले व्यक्ती, महिला बचत गट, उत्कृष्ट कार्य करणारे सुरक्षा दलाचे सदस्य, वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या मुली आदींचा सत्कार करण्यात आला. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष डॉ. प्रदीप रोकडे यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य अर्जुन नागपुरे, रामेश्वर हरिणखेडे, घनश्याम मस्करे, राजू जैन, उपविभागीय अधिकारी दिलीप सावरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिऱ्हे, तहसीलदार संजय पवार, खंडविकास अधिकारी एस.के.वालकर, पोलीस निरीक्षक एम.एस. सयद उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा