फॅन्सी नंबर असलेल्या वाहनांवरही कारवाई
पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट व गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षितेच्या दृष्टीने परराज्यातील वाहनांची चौकशी व ‘फॅन्सी’ क्रमांकाच्या वाहनांवर कारवाईची मोहीम वाहतूक शाखेकडून हाती घेण्यात आली आहे. मराठी क्रमांक हा सुद्धा ‘फॅन्सी नंबर प्लेट’ मध्येच येत असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. सोमवारी एका दिवसात शहरात ५८१ फॅन्सी क्रमांक असलेल्या वाहनांवर कारवाई करून साठ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली.
गणेशोत्सवात सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेरच्या राज्यातील व पुण्यात वापरल्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. परराज्यातून पुण्यात आणलेल्या वाहनांची पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) एका वर्षांत नोंदणी करणे बंधनकारक असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने परराज्यातील वाहनांची तपासणी करून त्यांची माहिती आरटीओ कार्यालयास देण्यात येणार आहे. ही कारवाई करताना सहसा वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतानाच केली जाईल. गणेशोत्सव संपेपर्यत ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पांढरे यांनी सांगितले.
मराठी नंबर प्लेट ही सुद्धा फॅन्सी नंबर प्लेटमध्ये येते. त्यामुळे अशी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवरही कारवाई केली जाईल. ज्या नागरिकांना आपल्या वाहनावर मराठी नंबर प्लेट लावायची आहे. त्यांनी इंग्रजीमध्ये व एक मराठीमध्ये अशा दोन नंबरप्लेट लावाव्यात. जोपर्यंत ‘फॅन्सी नंबरप्लेट’ बदलली जात नाही, तोपर्यंत त्या वाहनावर कारवाई केली जाईल. नंबर प्लेट बनविणाऱ्या दुकानदारांनाही फॅन्सी नंबरप्लेट न बनवण्याच्या बाबतच्या नोटीसा दिल्या आहेत, असे पांढरे म्हणाले.       

वर्षांत २७ हजार वाहनांवर कारवाई
वाहतूक शाखेकडून वर्षभर फॅन्सीनंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. यंदा वर्षभरात २६ हजार ८५२ ‘फॅन्सीनंबर प्लेट’ असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २८ लाख ६२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली.

Story img Loader