गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी घरी आलेल्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणि षोडशोपचार पूजा करण्यासाठी बहुतांश घरांमधून आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनही पौरोहित्य करणाऱ्या भटजीबुवांना प्रचंड मागणी असते. मुंबईत दीड लाखांहून अधिक घरगुती गणपती तर अकरा हजारांहून अधिक सार्वजनिक गणपती असले तरी त्या तुलनेत पूजा सांगणाऱ्या भटजीबुवांची संख्या मात्र कमी आहे. त्यामुळे गणपती लाखभर आणि भटजीबुवा मूठभर असे चित्र आहे.
मुंबई शहर-उपनगरे, ठाणे, डोंबिवली-कल्याण, नवी मुंबई या परिसरात पौरोहित्य व्यवसाय करणारे चार ते पाच हजार गुरुजी आहेत. काही जण केवळ गणपतीच्या दिवसात आवड, काही प्रमाणात आर्थिक मिळकत आणि ज्यांच्या घरी गणपती येतो त्यांचीही सोय म्हणून गणपतीचीपूजा सांगतात. त्यांनी पौरोहित्याचे शिक्षण घेतलेले नसते पण पुस्तकातून वाचून ते पूजा सांगतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा सांगण्यासाठी भटजीबुवांची अक्षरश: लगीनघाई असते. पहाटे चार वाजल्यापासून ते दुपारी दोन-चार वाजेपर्यंत त्यांची धावपळ सुरू असते.
श्रीवल्लभ जोगळेकर यांचा परंपरागत पौरोहित्याचा व्यवसाय आहे. त्यामुळे चतुर्थीला पन्नास यजमानांकडील गणपतींची पूजा त्यांच्याकडे असते. सकाळी वेळेवरच सर्व पूजा पार पाडून प्राणप्रतिष्ठा करणे एकटय़ाला शक्य नसल्याने या दिवशी ते कोकणातून काही गुरुजींना मुंबईत बोलावून घेतात. घरच्या गणपतीची पहाटेच प्राणप्रतिष्ठा करून अन्य पूजा सांगण्यासाठी ते बाहेर पडतात. त्यांचे टिळक पंचांग असल्याने त्यांच्या घरचे गणेशागमन होऊन गेले असल्याने घरी गणपती नसल्याने थोडी धावपळ कमी होईल, असे ते म्हणतात.
गणपतीची पूजा सांगणारी पुस्तके, पोथ्या, ध्वनिचित्रफिती उपलब्ध असल्या किंवा खासगी दूरचित्र वाहिन्यांवरून पहिल्या दिवशी गणपतीची पूजा सांगितली जात असली तरी त्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. गुरुजींना घरी बोलावून विधिवत प्राणप्रतिष्ठा करून पूजा करून घेण्याची मानसिकता आजही आपल्याकडे आहे, असे जोगळेकर म्हणाले. चेतन खरे हेदेखील गणेशोत्सव काळात खूपच घाई-गडबडीत असतात. पहिल्या दिवशी पहाटे चार ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पूजा सांगण्याचे काम सुरू असते. ते दहा घरांमध्ये पूजा सांगण्यासाठी जातात. प्रत्येक घरी पूजेसाठी सुमारे एक ते सव्वा तास लागतो. पूजा सांगण्यासाठी ज्यांना गुरुजी मिळत नाहीत, अशी मंडळी ध्वनिचित्रफितीवरून पूजा करतात. गणपतीची पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठा, षोडशोपचार पूजन, उत्तरपूजा आदीसाठी एक ते दीड हजार रुपये इतकी दक्षिणा घेण्यात येत असल्याची माहितीही काही गुरुजींकडून देण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा