भीमाशंकर तीर्थस्थानाच्या पायथ्याशी असणाऱ्या माळीण गावावर जुलैच्या शेवटच्या दिवसांमध्ये प्रलय कोसळला. संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्यामध्ये नाहीसे झाले. त्यानंतर सुरूझाला तेथील गावकऱ्यांच्या शोधाचा अविरत प्रवास. गावातील कुटुंबच्या कुटुंब मृत्युमुखी पडले. गावातील अनेकांवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या नातेवाईकांवर आली. या निसर्ग प्रकोपाची छाया यंदाच्या गणेशोत्सवावरही असून अनेक मंडळांनी हा प्रलय आपल्या देखाव्यांमधून साकारीत माळीणच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. काही मंडळांनी देखाव्याचा खर्च माळीणच्या गावकऱ्यांसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाण्यातील बाळकुम गावातील अशोकनगर येथील तरुणांनी ‘माळीण गावाची’ हुबेहूब प्रतिकृती साकार करून यंदाचा गणेशोत्सव ‘माळीणच्या’ प्रलयाच्या आठवणींसाठी अर्पण केला आहे. देखाव्यामध्ये या मंडळांनी ‘माळीण’ गावचे पूर्वीच्या आणि प्रलयानंतरचा उद्ध्वस्त परिसर दृश्यांच्या माध्यमातून साकार केला आहे. अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी मंडळाने गणेशाला साकडे घातले असून गणेशभक्तांना वृक्षसंपदा जतन करून निसर्गाचा समतोल साधण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. दगडखाणी, टाळा, डोंगर वाचवा, निसर्गाचा संवर्धन केलात तरच माणूस वाचेल, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. माळीणच्या प्रलयंकारी घटनेमुळे कल्याणातील गुरुमुख सोसायटीमधील देखाव्यावरील खर्च पूर्णपणे टाळून विनादेखावा गणेशोत्सव या मंडळांनी साकार केला होता. त्याचप्रमाणे गणपती सजावटीच्या आजूबाजूला अनाथ मुलांनी साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन या मंडळाने आयोजित केले होते. या गणेश मंडळाला भेट देणाऱ्या गणेशभक्तांना प्रदर्शन पाहण्याबरोबर मुलांनी काढलेले चित्र खरेदी करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली होती. या माध्यमातून मिळालेला पैसा अनाथ कलाकार मुलांना देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त देणगीतून जमा होणारा पैसा माळीणसाठी पाठवणार असल्याचे सद्गुरू कार्य चॅरीटेबल ट्रस्टचे संकेत डामरे यांनी सांगितले.
भपकेबाज सजावटीचा निधी माळीणच्या उभारणीसाठी
भीमाशंकर तीर्थस्थानाच्या पायथ्याशी असणाऱ्या माळीण गावावर जुलैच्या शेवटच्या दिवसांमध्ये प्रलय कोसळला. संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्यामध्ये नाहीसे झाले. त्यानंतर सुरूझाला तेथील गावकऱ्यांच्या शोधाचा अविरत प्रवास.
First published on: 04-09-2014 at 06:51 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh mandal giving fund to malin victims