अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते व गणभक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी संजय तेली यांनी केले. सूर्यास्तापूर्वी गणेशमूर्तीचे विसर्जन करणाऱ्या संवेदनशील मंडळांचा प्रशासनातर्फे विशेष गौरव करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
कराड शहर पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समिती व संवेदनशील गणेश मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे, तहसीलदार सुधाकर भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह शहर पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत असलेले शांतता व गुन्हे प्रतिबंधक समितीचे सदस्य तसेच शहरातील निवडक मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
संजय तेली म्हणाले, की गणेशोत्सव हा पवित्र उत्सव मंगलमय करण्यासाठी प्रशासनासह मंडळांचे कार्यकर्ते उत्सवाच्या आधीपासून व उत्सव संपल्यानंतरही कार्यरत असतात. गणेशोत्सव हा प्रबोधनाचे व्यासपीठ होऊन समाजातील विकृतींचा बीमोड करण्यासाठी उत्सवांच्या निमित्ताने प्रयत्न होणे काळाची गरज आहे. यासाठी प्रशासनाइतका मंडळांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने उत्सवादरम्यान विशेषत: विसर्जन मिरवणुकीवेळी कार्यकर्ते व नागरिकांनी गैरप्रकारांना आळा घालून प्रशासनाला सहकार्य कारण्याची भूमिका ठेवावी. मितेश घट्टे यांनी गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून उत्सव मंगलमय बनवण्याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी मंडळांच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्या अडीअडचणी प्रशासनासमोर मांडून मंडळे राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

Story img Loader