मातीतून देवाचे रूप घडविणारे हात आजही पनवेलमध्ये गणेशमूर्तीना आकार देण्यासाठी राबत आहेत. गणपतीच्या मूर्ती बनविणारे पाच कारखाने पनवेल गावामध्ये आजही अविरत सुरू आहेत. बदलत्या युगाप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूपांतर खासगी गणेशोत्सवात झाले. घरोघरी येणाऱ्या देवबाप्पाच्या मूर्तीची पसंतीही बदलत्या फॅशनप्रमाणे झाली. यामुळेच यंदा जय मल्हार गणेशमूर्तीची मागणी जोर धरू लागली. टिळक रोडवर संतोष कला केंद्र यांचा कारखाना आहे. हरेश उकळुरकर, बुवा चिरनेरकर आणि रामनाथ पेणकर आणि पनवेलकर यांचे मिर्ची गल्ली-कुंभारवाडा येथे कारखाने आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या जमान्यात शाडूंच्या मूर्तीलाही भरपूर मागणी आहे. मात्र मातीच्या मूर्त्यां बनविणाऱ्या कारगिरांअभावी या शाडूंच्या मूर्त्यांची मागणी कारखानदार पूर्ण करू शकत नाहीत. एका मूर्तीसाठी दुप्पट रक्कम असूनही पर्यावरणरक्षणासाठी आजकाल गणेशभक्त शाडूंच्या मूर्त्यांकडे सरसावल्याचे मूिर्तकार संतोष कुंभार सांगतात. पनवेल परिसरात आणि सिडको वसाहतींमध्ये गाळ्यागाळ्यांमध्ये, फुटपाथवर प्लॅस्टिकच्या छताखाली घाऊक मूर्त्यां विकण्याचा धंदा हल्ली तेजीत आहेत. या स्पर्धेत पारंपरिक कुंभार नसलेल्या अनेकांनी मूर्ती विकण्याचा सीझनप्रमाणे धंदा सुरू केला आहे. चिंचपोकळीचा राजा, लालबागचा राजा आणि पुणे येथील दगडूशेठ हलवाई यांच्या मूर्तीची मागणी कायमस्वरूपी एवढीच आहे. मात्र हल्ली टेलिव्हिजन मालिकांमुळे ‘जय मल्हार’ प्रकारातील मूर्तीची मागणी मूर्तिकारांकडे वाढली आहे. दीड हजारांपासून हे कारखानदार मूर्त्यांची किंमत घेतात. मूर्त्यांच्या जडणघडणीवर, रंगांच्या छटेवर तिची किंमत ठरते. पनवेलमध्ये २० हजार रुपयांच्या पुढेही मूर्त्यांचे दर गेले आहेत. मात्र घरोघरी बसणाऱ्या मूर्त्यांची सरासरी किंमत दीड ते पाच हजारांपर्यंत आहे. शाडूच्या मूर्तीसाठी हाच भाव दुप्पट आकारला जातो. मात्र शाडूच्या ठरावीक मूर्त्यांची ऑर्डर घेतली जाते. पनवेलमध्ये जागेच्या किमती वाढल्या आहेत. भाडय़ाच्या जागेसाठी हजारो रुपये महिन्याला मोजावे लागतात. त्यामुळे जागेअभावी या कारखानदारांना जास्त मूर्त्यां बनविणे शक्य होत नाही. एक मूर्ती बनविण्यासाठी तीन दिवस त्यानंतर ती सुकण्यासाठी ८ ते १५ दिवस लागतात. त्यानंतर त्याची रंगरंगोटी असे वेळेचे गणित साधून एक मूर्ती २५ ते ३० दिवसांत बनते. त्यामुळे एक कारखानदार साडेतीनशे ते पाचशे मूर्त्यां बनवितात. पनवेल नगर परिषदेने या पारंपरिक मूर्तिकारांचे जतन करण्यासाठी मूर्तीच्या कारखानदारांना नगर परिषदेच्या गाळ्यांमध्ये सवलतीच्या दरात जागा उपलब्ध करून दिल्यास परंपरा जपण्यासाठी हे मोठे पाऊल नगर परिषदेकडून उचलले जाईल, अशी अपेक्षा मूर्तिकारांकडून व्यक्त होत आहे.

Story img Loader