तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना यंदा बंदच राहण्याची शक्यता अधिक असल्याने कामगारांना बोनस तर दुरच तीन महिन्यापासुन पगारही मिळाला नाही. ऐन दिवाळीत कामगार हतबल झाले आहेत. संचालक मंडळाला या अडचणीतून मार्ग काढण्यास सातत्याने अपयश येत असल्याने कारखान्याचे संचालक नितीन कापसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आणखीही काही संचालक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. कारखान्याच्या ५३ वर्षांच्या इतिहासात कामगारांना पगार नसल्याची ही पहिलीच वेळ आहे.
कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक कुठलाही निर्णय न होता संपली. कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीच्या ठिकाणी जाऊन किमान एक महिन्याच्या वेतनाची मागणी केली, त्यासही कारखान्याचे अध्यक्ष नारायण कार्ले यांनी असमर्थता दर्शविली. दोन दिवसात काही तरी मार्ग काढू असे आश्वसन काही संचालकांनी दिले. पदाधिकाऱ्यांसमवेत आलेले कामगार निराश भावनेने येथुन परतत असतांना संचालक कापसे यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे गणेश कारखाना चालविण्यास घेत होते, पंरतु हा कारखाना राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने संचालक मंडळाने राजकीय गैरसोय नको म्हणुन त्यांना संधी दिली नाही. कारखान्याचे मार्गदर्शक शंकरराव कोल्हे यांनीही कारखान्याकडे पाठ फिरवली. शेतकऱ्यांना व्याज नाही, कारखाना सुरु होत नाही त्यामुळे संचालकपद कशासाठी हवे असा सवाल करत कापसे यांनी अध्यक्षांकडे राजीनामा दिला. पगार नसल्याने ८५० कामगारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
पुणे येथील बीव्हीजी ग्रुपने कारखाना चालविण्यास नकार दिला. आता कारखाना भाडेतत्वावर घेण्याची पुर्ण आशा मावळली आहे. यावर्षी ऊस असुनही कारखाना बंद राहणार आहे. पुढील वर्षी ऊस नसल्याने कारखाना बंद राहील. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी वेळोवेळी कारखाना बंद ठेवण्याचा संचालक मंडळाला सल्ला दिला एवढेच नव्हे तर गणेश बंद पाडण्याचे भाकीत केले यामुळे सभासद व कामगारांमध्ये संचालक मंडळाच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सभासद व कामगारांना पेमेंट नसल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा