कारखान्यात घुसून चाकूच्या धाकाने धातूच्या वडय़ा चोरणाऱ्या टोळीतील सहा जणांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. आठ जणांच्या या टोळीकडून सुमारे २ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून दोन जण अद्याप फरारी आहेत.
तलासरी तालुक्यातील आच्छाड एमआयडीसीत ११ एप्रिल रोजी जस इंडस्ट्रीज कंपनीच्या कारखान्यात आठ दरोडेखोर घुसले होते. चाकूचा धाक दाखवत त्यांनी कंपनीमध्ये ठेवलेल्या ३ हजार ९८६ किलो वजनाच्या १९ लाख ९३ हजार रुपये किमतीच्या तांबे व निकेल या मिश्र धातूच्या आयताकृती ७२ ते ७५ विटा चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी जनार्दन प्रसाद यांनी तक्रार दाखल केली होती. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांनी याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. कोणत्याही प्रकारचे धागेदोरे नसल्याने या प्रकारच्या गुन्ह्य़ाची कार्यपद्धती असलेल्या आरोपींची माहिती घेण्यास गुन्हे शाखेने सुरुवात केली. त्या वेळी मोहमंद उमर शाहमोहमद शाह (३२) हा आरोपी नुकताच कारागृहातून सुटल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मोहमंद याने यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची पोलिसात नोंद होती. त्यामुळे मोहमंदला पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र सखोल चौकशी केल्यानंतर अन्य सात साथीदारांच्या मदतीने आपण हा गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. विजय यादव (२७), अर्जुन ऊर्फ राजू पावसे (३६), अली ऊर्फ अहमद हसन शहा (३६), निजामउद्दीन खान (४२) आणि अल्ताफ खान (१९) या अन्य पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा