राजकीय नेत्यांच्या पाठबळामुळे पाचगावमध्ये बोकाळलेल्या टोळीयुद्धात धनाजी गाडगीळ हा आणखी एक बळी गेला आहे. ‘खून का बदला खून’ या प्रवृत्तीतून भरदिवसा पाचगावमध्ये खून करण्याचे प्रकार वाढत चालले असून, या टोळीयुद्धातील संघर्ष आणखीनच टोकदार झाला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार धनंजय महाडिक यांच्या पाठबळामुळे पाचगावातील त्यांच्या समर्थकांत रक्तरंजित सूडनाटय़ घडत आहे.     
कोल्हापूर शहराच्या हद्दीला लागूनच पाचगाव वसले आहे. शहराचा विस्तार होऊ लागल्याने पाचगावात राहण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली तसतसे पाचगावात भूखंडमाफियांचे पेव फुटले. त्यांच्यातील वर्चस्वाच्या वादातून प्रतिस्पध्र्याना आयुष्यातून उठविण्याची कूकर्मे घडू लागली. यातून एकाहून एक गंभीर गुन्हय़ांची मालिकाच तेथे उदयाला आली. अशातच पाचगावात सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक यांच्यातील राजकीय संघर्षही उफाळून आला. पाचगावात आपला वरचष्मा राहावा यासाठी या नेत्यांनी स्थानिक नेतृत्वाला पाठबळ देण्यास सुरुवात केली. राजकीय वरदहस्तामुळे स्थानिक नेतृत्व, विशेषत: भूखंडमाफिया यांच्यातील संघर्षही बोकाळला. जिल्हा परिषद निवडणुकीत पाण्याच्या प्रश्नावरून मतदानावर बहिष्कार टाकण्यापर्यंत मजल गेली.     
या निवडणुकीत अशोक पाटील आणि दिलीप जाधव यांच्यात राजकीय संघर्ष रंगला, तर त्याचे स्वरूप मात्र पाटील विरुद्ध महाडिक असे होते. या संघर्षांतून अशोक पाटील याचा भरदिवसा गोळय़ा घालून खून करण्यात आला. यातील आरोपी म्हणून दिलीप जाधव याचे नाव पुढे आले. ही घटना ताजी असतानाच रविवारी रात्री धनाजी गाडगीळ याचा तलवारीचे वार करून खून करण्यात आला. या गुन्हय़ात महाडिक गटाचे अजित कोरे, रहिम सनदी, सुनील घोरपडे, अशोक पाटील यांची दोन मुले यांची नावे पुढे आली आहेत.
दरम्यान, धनाजी गाडगीळ खूनप्रकरणी सोमवारी रात्री मिलिंद अशोक पाटील (वय २४), प्रमोद कृष्णात आयरेकर-शिंदे (वय २१) या दोघांना अटक केली आहे. उर्वरित चौघांचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक विठ्ठल पवार यांनी सोमवारी रात्री पत्रकारांना सांगितले.