पनवेलमध्ये ‘गंगा’ अवतरली आहे. पनवेल एसटी स्टॅण्डच्या मागील बाजूस नवनाथनगरमध्ये जाणाऱ्या मार्गावर या ‘गंगे’चे दर्शन रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मिळते. ही ‘गंगा’ येथील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांसाठी मोठा आधार बनली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राजापूर येथील गंगा सुप्रसिद्ध आहे. या गंगेच्या कुंडातील पाणी पवित्र असल्याची धारणा कोकणस्थांची आहे. मात्र अशाच प्रकारे पनवेलच्या एसटी स्टॅण्डच्या मागील परिसरात जमिनीतून पाणी येऊ लागल्याने पनवेलमध्येही गंगा अवतरल्याची चर्चा आहे. भूमिगत जलवाहिनी फुटल्याने या ‘गंगे’चा उगम झाल्याचे बोलले जाते. मात्र या ‘गंगे’चे पाणी पूर्णता दूषित असून येथील काही रहिवाशी पिण्याच्या पाण्यासाठी या गंगेचा उपयोग करतात आहे. मात्र या गंगेच्या उगमातील पाण्याचे येथे कुंड बांधले नसल्याने येथील रहिवाशांनी या गंगेच्या पाण्याला रोजच्या जीवनाची साथी बनवली आहे. याच पाण्याचा उपयोग येथील महिला कपडे धुणे, भांडी धुणे आणि पिण्यासाठी करतात. मात्र हे पाणी जलवाहिनीचे नसल्याचे सांगण्यात येत आहे. एसटी स्टॅण्डच्या मागेच देहरंग धरणातून येणाऱ्या पाण्यासाठी जलशुद्धीकरणाचे केंद्र आहे. या केंद्रातील पाणी शुद्धीकरण झाल्यावर सांडपाणी सोडणारी ही वाहिनी असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येते. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याच्या सूचना येथील रहिवाशांना दिल्याचे पाणीपुरवठा समितीचे सभापती सुभाष भुजबळ यांनी सांगितले. लवकरच याविषयी खात्री करून येथील फुटलेली वाहिनी दुरुस्त केली जाईल, असे भुजबळ यांनी सांगितले. सोमवारी देहरंग धरणातील पाणीसाठा संपल्याने पनवेलकरांच्या तहान भागविण्यासाठी पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे (एमजेपी) आधार मागितला आहे. एमजेपीचा पाणीपुरवठा संपूर्ण पनवेलकरांना बुधवारपासून सुरू होणार आहे.
पनवेल नगर परिषद परावलंबी
१८५२ साली स्थापना झालेल्या पनवेल नगर परिषदेला देहरंग धरणवगळता स्वत:चे इतर जलस्रोत असूनही उभी करू शकली नाही. प्रशासनाप्रमाणे येथील राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे पनवेलकरांना नेहमीच एमजेपीकडे पाण्यासाठी परावलंबी राहवे लागले. हेच पनवेलकरांचे दुर्दैव आहे. येथील लोकप्रतिनिधींनी पनवेलकरांच्या हक्काच्या धरणासाठी जुन्या मोरबे धरणाची दुरुस्ती केल्यास पाणीप्रश्न सुटण्याची शक्यता आहे. इतर जलस्रोताचे हक्काचे पाणी पनवेलकरांच्या पदरात पडेल.
पनवेलमध्ये ‘गंगा’ अवतरली!
पनवेलमध्ये ‘गंगा’ अवतरली आहे. पनवेल एसटी स्टॅण्डच्या मागील बाजूस नवनाथनगरमध्ये जाणाऱ्या मार्गावर या ‘गंगे’चे दर्शन रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मिळते.
First published on: 30-04-2014 at 08:53 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganga river in panvel