आंभोरा मार्गावरील मांढळपासून उत्तरेस तीन किमी दूर असलेले नवेगाव या गावातील गंगादेवी मंदिर जागृत देवस्थान असून या मंदिराला चारशे वर्षांपेक्षा जास्त इतिहास आहे. नवरात्र उत्सवात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या मंदिराबाबत बोलताना मंदिराचे प्रमुख कृष्णा कढव म्हणाले, ज्या ठिकाणी मंदिर आहे तो पूर्वी भोसलेकालिन परिसर. परिसरात केवळ देवीची मूर्ती होती. मूर्तीवर कुठलेही शेड नव्हते मात्र ७५ वर्षांपूवी त्या भागात पडझड झाली होती त्यामुळे त्या भागातील घरे आणि मंदिर उद्ध्वस्त झाली होती मात्र, मंदिर आहे त्याच ठिकाणी होते. राजे भोसले या मंदिरात येत असे असा इतिहासात उल्लेख आहे. ब्रिटीशांच्या काळात भिवानी भगत देवीच्या मंदिराची पूजा व तेथील व्यवस्था पहात होते. भिवानी भगत हे सिद्ध पुरूष होते. स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांना अटक केली होती. त्यांनी रातोरात देवी शक्तीने उमरेडच्या जेलमधून बाहेर आले आणि देवीच्या मंदिरात जाऊन बसले अशी आख्यायिका आहे. मध्यंतरीच्या काळात मंदिरात पडझड झाली होती. अंधश्रद्धा आणि बुवाबाजीचे प्रकार या भागात मोठय़ा प्रमाणात वाढू लागले होते. १२ ऑक्टोबर १९९५ मध्ये मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला.
गंगादेवीची मूर्ती स्वयंभू आहे की तिची स्थापना करण्यात आली याचा उल्लेख मात्र कुठेच नाही. मंदिराचा जिर्णोद्धार सुरू केला त्यावेळी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण भाविकांनी केलेल्या मदतीमुळे मंदिराचा जिर्णोद्धाचे काम पूर्ण होत गेले आणि आज या ठिकाणी प्रशस्त असे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराचा जिर्णोद्धार झाल्यानंतर कलश आणि प्रतिष्ठापना करण्यात आली. महालक्ष्मी याग आयोजित करण्यात आला होता. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, जिल्ह्य़ातील अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. २००८ मध्ये शतचंडी याग आयोजित करण्यात आला होता त्यावेळी आजूबाजूच्या गावातील ५० हजारपेक्षा अधिक भाविक उपस्थित होते. नवरात्र उत्सवात मंदिरात दररोज भजन कीर्तन आणि महाप्रसाद आयोजित केला जातो. नागपूरवरून अनेक भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात. सकाळी ७ वाजेपासून कुही मांढळ, आंभोरा या परिसरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसरात सभागृह बांधण्यात आले आहे.  
गेल्या अकरा वर्षांपासून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मंदिरात बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात येत असून आतापर्यंत ग्रामीण भागातील एक हजारच्या जवळपास विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. ह.भ.प, बारई महाराज या मंदिरात विविध उपक्रम राबवित असतात. या शिवाय अमृत दिवाण गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम होत असतात. गोळा परिसरात बांधण्यात आली असून गोग्राम यात्रेचे या ठिताणी आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या परिसरात येणाऱ्या काळात धर्मशाळा आणि संस्कार शिबिरासाठी सभागृह बांधण्याचा मानस असल्याचे कृष्णा कढव यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा