आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून फोडाफोडीच्या प्रयोगात काँग्रेसला धक्का देण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे. मुखेडचे माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड यांच्यासह काहीजण शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
मुखेड विधानसभा मतदारसंघात राठोड कुटुंबीयांचे बऱ्यापकी वर्चस्व आहे. काँग्रेसमध्ये राहून काही डाळ शिजणार नाही, असे लक्षात येताच आता राठोड परिवाराने नवा पर्याय शोधण्याला प्रारंभ केल्याचे सांगण्यात आले. आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर व राठोड यांच्यात फारसे सख्य नाही. गेल्या निवडणुकीत गोिवद राठोड यांनी बंडखोरी केली. परंतु कमी मतांनी त्यांचा पराभव झाला. आगामी निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्यापेक्षा कोणत्या तरी पक्षाचा झेंडा खांद्यावर घ्यावा, याच विचाराने राठोड यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याचे कळते. माजी आमदार सुभाष साबणे यांचे राठोड कुटुंबीयांशी पूर्वीपासूनच सख्य आहे. स्वत: साबणे यांनी माजी आमदार किशन राठोड, गोिवद राठोड, गंगाधर राठोड यांना शिवसेनेत प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
राठोड बंधूंच्या शिवसेना प्रवेशाची कुणकुण लागल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मधल्या काळात माजी आमदार किशन राठोड यांना मुंबईत बोलावून त्यांची समजूत काढली होती. मुखेड पालिकेला अन्य पालिकांप्रमाणे सरकारकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. चव्हाणांच्या शिष्टाईनंतर शिवसेना प्रवेशाची प्रक्रिया काही अंशी मंदावलीही होती. मुखेड पालिकेला दोन कोटी अनुदान देण्याची शिफारस माजी मुख्यमंत्र्यांनी केली होती. पण ते मिळाले नाही याचीही नाराजी असल्याचे सांगण्यात आले. गंगाधर राठोड मात्र सेनेत जाण्याच्या मनस्थितीत आहेत. मुखेड मतदारसंघात काँग्रेसला टक्कर देण्यास सेनेकडूनही प्रबळ व सक्षम उमेदवाराचा शोध सुरू होता. राठोड यांचा प्रवेश झाल्यास त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. राठोड यांच्या वतीने मात्र शिवसेना प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. शिवसेनेत ते जातील की नाही, या बाबत त्यांचे समर्थकही साशंक आहेत.
शिवसेना देणार प्रबळ उमेदवार
सेनेतला पदाधिकारी मनसेत गेल्यानंतर वरिष्ठ पातळीवर स्वतची प्रतिमा कायम ठेवण्यास सेनेचे पदाधिकारी फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहेत. सेनेच्या वाटय़ाला असलेल्या सर्वच मतदारसंघांत काँग्रेस उमेदवाराविरुद्ध प्रबळ उमेदवार देण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. गंगाधर राठोड यांच्यासह कंधार येथेही अन्य पक्षांतील काही पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश देण्याचे निश्चित झाले आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर हेमंत पाटील यांचा दावा असला, तरी उत्तर मतदारसंघात कोण उमेदवार असावा, या बाबत विचारविनिमय सुरू झाला आहे. सेनेतले काही पदाधिकारी इच्छुक असले, तरी यातील कोणीही जोरदार लढत देऊ शकत नाहीत, असे लक्षात आल्याने आता अन्य पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची चाचपणी सुरू झाली आहे. सेनेतल्या पक्षप्रवेशाचा सोहळा लवकरच होणार असल्याच्या वृत्ताला एका पदाधिकाऱ्याने दुजोरा दिला. मात्र, कोण कोण येण्यास इच्छुक आहेत या बाबत त्यांनी मौन बाळगले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा