साधारणत: महिनाभरापूर्वी सलमान खान आणि सुनील शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत वाजतगाजत उद्घाटन झालेल्या गंगापूर धरणावर बोट क्लबचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या नाशिककरांसह पर्यटकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण धरणावरील क्लबमध्ये आता बोटींचा पत्ताच नसून अर्धवट राहिलेली कामे प्रगतिपथावर आहेत. उद्घाटनानंतर सर्व काही सुरळीत झालेले असेल या अपेक्षेने बोटीत रपेट मारण्यासाठी आलेल्यांचा भ्रमनिरास होत आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच म्हणजे फेब्रुवारीच्या अखेरीस गंगापूर धरणावरील नेचर बोट क्लबचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले होते. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी साकारलेल्या बोट क्लब सोबत अॅडव्हेंचर्स स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कन्व्हेन्शन सेंटर, लेक व्हू रिसॉर्टचे भूमिपूजन हे कार्यक्रम एकाच वेळी झाले. शहराची तहान भागविणाऱ्या या धरणावर बोट क्लब असावा की नाही, याबद्दल प्रवाद आहेत. हिवाळ्यात धरणावर दाखल होणाऱ्या परदेशी पक्ष्यांना बोटींचा संचार त्रासदायक ठरणार असल्याचे सांगत नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीने या प्रकल्पास प्रारंभी विरोध दर्शविला होता. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, बोट क्लबचे उद्घाटन करण्यात आले. सोहळ्यास सलमान खान व सुनील शेट्टी यांसारखे दिग्गज अभिनेते उपस्थित होते. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बोटी, एअरो स्पीड बोट, बनाना बोट, रिगल बोट आदी उपलब्ध करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रमुख मान्यवरांनी स्पीड बोटीतून पाण्यात रपेट मारत क्लबचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. शेकडो महाविद्यालयीन युवक-युवती तेव्हा उपस्थित होते.
शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर बोट क्लब साकारल्याने युवा वर्गासह नाशिककरांमध्येही भ्रमंतीसाठी एक अनोखे ठिकाण उपलब्ध झाल्याची भावना निर्माण झाली. तथापि, हा बोट क्लब महिनाभरापासून निव्वळ शोभेचे बाहुले ठरला आहे.
आचारसंहिता काळात उद्घाटन करता येणार नाही म्हणून घाईघाईत हा सोहळा उरकण्यात आला. सलमान खान व सुनील शेट्टी यांनी बोटीतून रपेट मारल्याने हा बोट क्लब सुरू झाल्याचा अनेकांचा समज झाला. त्यामुळे दररोज सकाळ व सायंकाळ महाविद्यालयीन युवकांसह अनेक कुटुंब बोट क्लबला भेट देण्यासाठी येतात. सुटीच्या दिवशी ही संख्या मोठय़ा प्रमाणात वाढते, परंतु उत्साहात धरणावर येणाऱ्यांचा बोट क्लबची सद्य:स्थिती पाहिल्यावर हिरमोड होतो. उद्घाटनावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या बोटी आणल्या गेल्या होत्या, परंतु सध्या या ठिकाणी एकही बोट दिसत नाही. बैठक व्यवस्था व तत्सम स्वरूपाची कामे सुरू आहेत. बोट क्लबचे काम पूर्ण झाले नसतानाच त्याचे उद्घाटन करण्यात आल्याचे येथे भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात येते. कुटुंबीयांसमवेत आलेले बालगोपाळ थोडा वेळ भटकंती करून आणि पाण्याचे दूर दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर लागतात.