कोल्हापूर शहराची कचरापूर अशी झालेली प्रतिमा बदलण्याच्या दृष्टीने सोमवारपासून शहर कचरामुक्त अभियान दणक्यात सुरू झाले. या निमत्ताने मंत्री, महापौर, नगरसेवक, अधिकारी, कामगार, विद्यार्थी यांनी शहरात प्रबोधन मिरवणूक काढली. शहर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेण्यात आली. शून्य टक्के कचरा करण्यासाठी टाकलेले हे पहिले पाऊल लक्षवेधी ठरले.
कोल्हापूर शहरातील कचरा गंभीर समस्या बनली आहे. याबाबत नागरिकांतर सातत्याने तक्रारी होत होत्या. तर माध्यमानींही याविरुध्द आवाज उठविला होता. महापालिकेच्या सभेतही या विषयावरून जोरदार चर्चा झाली होती. या साऱ्या घटनांचे अवलोकन करून महापौर कादंबरी कवाळे यांनी शहर कचरा मुक्तअभियान सुरू करण्याचा संकल्प सोडला होता. सोमवारी याचा प्रारंभ महालक्ष्मी मंदिराजवळील संत गाडगेबाबा महाराजांच्या पुतळ्यापासून झाला.
या मोहिमेचे उद्घाटन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी शहर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेण्यात आली. महापौर कादंबरी कवाळे यांनी उपक्रमांची माहिती दिली. शून्य टक्के कचरा करण्याच्या दृष्टीने शहर स्वच्छता अभियान राबविता येत आहे. हा उपक्रम वर्षभर चालविला जाणार आहे. याची शाळा,कॉलेज, नागरिक व व्यावसायिकांमध्ये जागृती केली जाणार आहे. स्वच्छता विभागाकडे अत्याधुनिक उपकरणे देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्लास्टिक कचरा कमी करणे, रिकाम्या जागांचा कचरा खत निर्मितीसाठी उपयोग करणे, झूम प्रकल्प सक्षमपणे कार्यान्वित करणे, टाकाळा खाण येथे कचरा टाकण्याचे नियोजन करणे, शहरातील कचरा २० टक्के कमी करणे आदींचा या अभियानात समावेश आहे, असे सांगण्यात आले. यानंतर या भागातच लोकप्रतिनिधींनी हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. मंत्री मुश्रीफ, महापौर कवाळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पोवार, उपायुक्त संजय हेरवाडे,अश्विनी वाघमळे आदींचा त्यामध्ये होता.
स्वच्छता मोहीम पार पडल्यानंतर शहराच्या मुख्य मार्गावरून प्रबोधन फेरी काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, नगरसेवक, नगरसेविका, आरोग्य विभागाचे अधिकारी, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘एकच नारा एकच सूर स्वच्छ सुंदर कोल्हापूर, कचरा उठाव शहर बचाव, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करा’ अशा आशयाचे फलक मिरवणुकीत होते. तशा घोषणाही दिल्या जात होत्या. याची सांगता महापालिकेच्या महादजी शिंदे चौकामध्ये करण्यात आली. विशेष म्हणजे आजच्या एकूणच कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वरूप प्राप्त झाले होते. नेत्यांपासून नगरसेवकांपर्यंत राष्ट्रवादीचाच भरणा होता. सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेससह विरोधी सदस्य अभावानेच दिसत होते.
————–
फोटोओळी
१) कोल्हापूर शहरात वर्षभर चालणाऱ्या शहर स्वच्छता अभियानाचा प्रारंभ लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी हाती झाडू घेऊन केला. यामध्ये कामगारमंत्री हसन मुश्रीफ, महापौर कादंबरी कवाळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पोवार, उपायुक्त संजय हेरवाडे, अश्विनी वाघमळे आदी प्रमुखांचा सहभाग होता.
२) शहर कचरा मुक्त करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या स्वच्छता अभियानानिमित्त सोमवारी प्रबोधन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कामगारमंत्री हसन मुश्रीफ, महापौर कादंबरी कवाळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पोवार, उपायुक्त संजय हेरवाडे, अश्विनी वाघमळे आदी प्रमुखांचा सहभाग होता.(छाया-राज मकानदार)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा