कल्याण-डोंबिवली, टिटवाळा पालिका हद्दीत रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग साचल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन ते तीन दिवस पालिका हद्दीतील कचरा उचलला जात नसल्याने कचराकुंडय़ा ओसंडून वाहत आहेत. पाऊस सुरू असल्याने कचरा कुजून परिसरात दरुगधीचे साम्राज्य पसरले आहे. याविषयी पालिका प्रशासन, नगरसेवक मूग गिळून असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
रेल्वे स्थानक भागातील कचराकुंडय़ा शहराच्या दर्शनी भागात असतात. या भागातील हॉटेल चालक नासाडी झालेले अन्य कचराकुंडय़ांमध्ये टाकत असल्याने कुजलेल्या कचऱ्याची परिसरात दरुगधी पसरली आहे.  रेल्वे स्थानकांच्या भागात हे चित्र दिसते. मुंबई, नवी मुंबई परिसरात रात्रीच्या वेळेत कचरा उचलून दिवसा शहर चकाचक ठेवले जाते. अशी कचरा उचलण्याची अंमलबजावणी कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाकडून का करण्यात येत नाही, असे प्रश्न नागरिकांकडून केले जात आहेत. एक ते दोन दिवसांनी कचरा उचलल्यानंतर त्या परिसरात दिवसभर कुजलेल्या कचऱ्याची दरुगधी पसरते. त्यावेळी परिसरातील रहिवाशांना दरवाजे, खिडक्या बंद कराव्या लागतात. आरोग्य विभागाचे उपायुक्त, आरोग्य निरीक्षक, मुकादम यांचा एकमेकांवर वचक नसल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे पालिकेत बोलले जात आहे.
चालक कमी – कचरा उचलणाऱ्या गाडय़ांचे बहुतेक चालक बाजार शुल्क वसुली, फेरीवाले कारवाई, आत्पकालीन व अन्य विभागात गेल्या काही वर्षांपासून सेवा देत आहेत. ‘मलईदार’ अशी ही खाती असल्याने या विभागातून बाहेर पडण्यास चालक तयार नसतात. परिणामी कचरा उचलणाऱ्या गाडय़ांवर चालक कमी पडत आहेत. हे चालक विभाग प्रमुखाला ‘हाताशी’ धरून आपले आहे त्या विभागातील स्थान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे शहरात कचरा पडला काय किंवा रोगराई पसरली काय त्याला कोणीही हात लावण्याचा प्रयत्न करीत नाही, असे पालिकेतील विश्वसनीय सूत्राने सांगितले.
सफाई कामगार घरी – अनेक सफाई कामगार काही पालिका
पदाधिकारी, अधिकारी यांच्या घरी घरकामाची सेवा देतात. पालिकेतील एका
सर्वोच्च पदाधिकाऱ्याच्या घरकामासाठी तीन महिला सफाई कामगार काम
करीत आहेत. एका महिलेने कामास टाळाटाळ केली होती. त्यावेळी या पदाधिकाऱ्याने प्रभाग कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची कानऊघडणी केली
होती, असे बोलले जाते.  आरोग्य विभागातील अनेक कामगार विविध ठिकाणी विखरून काम करीत असल्याने शहरातील कचरा उचलण्यास कामगार कमी
पडत आहेत. तसेच कचरा गाडय़ांवर चालकांची संख्या कमी पडत असल्याचे बोलले जाते.
डम्पिंग ग्राऊंडवर कोंडी – आधारवाडी कचराक्षेपण केंद्राच्या मध्यभागी कचरा टाकण्यासाठी सुमारे २५ लाखांहून अधिक रक्कम खर्च करून तयार करण्यात आलेला रस्ता खराब झाला असल्याने कचऱ्याच्या गाडय़ा क्षेपण केंद्राच्या मध्यभागी जात नाहीत. क्षेपण केंद्राच्या तोंडालाच कचरा खाली करावा लागतो. त्यामुळे दरुगधी परिसरात पसरते, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले. हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा म्हणून पालिकेत हालचाली सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. उपायुक्त सुरेश पवार कोकण भुवन येथे लोकशाही दिन कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा