घंटागाडी कामगारांचा संप भोवला
* महापालिकेचे प्रयत्न तोकडे
* रुग्णालयाभोवती कचऱ्याचे ढीग
* वागळे, वर्तकनगर बनली कचऱ्याची आगारे
घंटागाडी कामगारांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेले उपाय कसे तोकडे पडू लागले आहेत, याचे चित्र शहरातील नाक्यानाक्यांवर दिसू लागले आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या संपामुळे ठाणे शहरावर कचरा संकट ओढावू नये, यासाठी महापालिकेचे नवे आयुक्त असीम गुप्ता यांनी युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तरीही ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरांत जागोजागी कचऱ्याचे ढीग साचू लागले असून अनेक भागांत सायंकाळी उशिरापर्यत कचरा उचलण्यात येत नसल्यामुळे दरुगधी पसरली आहे. संततधार सुरू असलेल्या पावसात कचरा असाच साचून राहिल्यास ठाणेकरांचे आरोग्य धोक्यात सापडेल, अशी भीती व्यक्त होण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.
ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरांत कचरा गोळा करणारे घंटागाडीवरील सुमारे ४५० कामगारांनी शुक्रवारपासून आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. शुक्रवारी दिवसभर महापालिकेच्या पथकाने कॉम्पक्टर आणि डंपरच्या सहाय्याने कचऱ्याची वाहतूक केली. तसेच शहरातील नऊ प्रभाग समित्यांच्या हद्दीत दररोज पडणारा कचरा उचलण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली. असे असले तरी रविवारी सायंकाळपासून शहरातील नाक्यानाक्यांवर ठेवण्यात आलेल्या कचराकुंडय़ांमध्ये कचऱ्याचे ढीग दिसू लागले असून या परिस्थितीत नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त गुप्ता यांनी केले आहे. ठाणे महापालिका हद्दीत दररोज सुमारे ६०० मेट्रिक टन इतका कचरा निर्माण होतो. यापैकी ३५० मेट्रिक टन इतक्या कचऱ्याची वाहतूक घंटागाडीमार्फत केली जाते. महापालिकेने नेमलेल्या तीन घंटागाडी कंत्राटदारांमार्फत १५५ घंटागाडय़ा हा कचरा उचलत असतात. उर्वरित कचरा महापालिकेच्या कॉम्पॅक्टरद्वारे उचलून क्षेपणभूमीपर्यंत पोहचविण्यात येतो. घंटागाडीची यंत्रणा पूर्णपणे मोडकळीस निघाल्याने कॉम्पक्टरद्वारे पुरेशा प्रमाणात कचऱ्याची वाहतूक होत नसल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. ठाणे शहरातील कचरा उचलण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे मूळ शहरातील कचरा कुंडय़ांवर कचऱ्याचे प्रमाण कमी दिसत असले तरी उर्वरित भागात मात्र सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र दिसत आहे. लोकमान्यनगर, वर्तकनगर, वागळे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा परिसरांतील अनेक भागांमधील कचरा वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे. वागळे परिसरातील कामगार रुग्णालयालगतच कचऱ्याचा भला मोठा ढीग साचल्याचे चित्र दिवसभर दिसत होते. रुग्णालयास लागून कचऱ्याचे ढीग साचू लागल्याने महापालिकेच्या यंत्रणेचे प्रयत्न अपुरे पडू लागल्याचे स्पष्ट दिसत होते.

Story img Loader