नवी मुंबई महापालिकेतील नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभाराचा फटका सध्या शहरातील नागरिकांना बसू लागला असून कचरा सफाई तसेच वाहतुकीची कामे अतिशय मंद गतीने सुरू असल्यामुळे नवी मुंबईतील जवळपास प्रत्येक उपनगरात घाणीचे ढीग साचल्याचे चित्र दिसू लागले आहे. नवी मुंबईत कचऱ्याची सफाई आणि वाहतूक अशी दोन वेगवेगळी कामे दिली जातात. या दोन्ही कामांचे नवे ठेके काढण्याची मंजुरी सर्वसाधारण सभेत काही महिन्यांपूर्वीच देण्यात आली आहे. अव्वाच्या सव्वा दराने ठरविण्यात आलेली ही कामे यापूर्वीच वादात सापडली आहेत. नवे ठेके दिले जाणार हे पक्के झाल्याने जुन्या ठेकेदारांनी कामचलाऊ कारभार सुरू केल्यामुळे शहरातील सफाईची यंत्रणाच कोलमडून गेल्याचे चित्र जागोजागी दिसू लागले आहे. नवे ठेके काढण्यात प्रशासनाचा चालढकलपणा सुरू असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या असून पावसाळ्याच्या तोंडावर नवी मुंबईत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसू लागले आहे.
नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमधील कचऱ्याची सफाई यापूर्वी ८४ ठेकेदारांमार्फत करण्यात येत असे. या ठेकेदारांची मुदत तब्बल सात वर्षांपूर्वी संपली आहे. त्यामुळे सफाईचे नवे कंत्राट काढण्यास मंजुरी द्यावी, अशा स्वरूपाचा प्रस्ताव महापालिकेने तीन वर्षांपूर्वी महापौर सागर नाईक यांच्याकडे सादर केला. अतिशय महत्त्वाचा असा हा प्रस्ताव महापौरांनी सर्वसाधारण सभेच्या पटलावरच घेतला नाही. त्यामुळे जुन्याच ठेकेदारांना मुदतवाढ देत सफाईची कामे सध्या सुरू आहेत. सफाई करणारे बहुतांश कंत्राटदार हे प्रकल्पग्रस्त कुटुंबातील असून त्यांची कामे इतर महापालिकांच्या तुलनेत चांगली आहेत. त्यामुळे सातत्याने मुदतवाढ देऊनही ही कंत्राटे वादात सापडली नव्हती. मात्र सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मध्यंतरी वाशी ते बेलापूर आणि कोपरखैरणे ते ऐरोली अशा दोन विभागांत सफाईचे कंत्राट आणण्यासाठी आग्रह धरला आणि महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील कंत्राटदारही त्यामुळे हवालदील झाले. यासंबंधीची अस्वस्थता वाढते आहे हे लक्षात घेऊन सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून ९० गटांमध्ये सफाईची कामे देण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. सफाईचा प्रस्ताव मंजूर करून घेताना शहरातील कचरा उचलण्याचा सुमारे २३० कोटी रुपयांचा वादग्रस्त प्रस्तावही मंजूर करण्यात आला असून ही दोन्ही कामे सध्या निविदा प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.
कचरा वाहतुकीचे कंत्राट वादात
कचरा वाहतुकीच्या सुमारे २३० कोटी रुपयांच्या कंत्राटाला मध्यंतरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थगिती दिली होती. त्यामुळे या कामाच्या निविदा काढणे प्रशासनाला शक्य नाही. सध्याच्या घडीस अ‍ॅन्थोनी कंपनीच्या माध्यमातून शहरातील कचरा उचलण्याचे काम केले जाते. मात्र या कंत्राटदाराच्या कामाविषयी अनेक तक्रारी असून त्यामुळे नव्या निविदा काढण्याचा प्रशासनाचा आग्रह आहे. यासंबंधी सर्वसाधारण सभेत मंजुरीचे सोपस्कारही उरकण्यात आले आहे. तरीही प्रशासनाकडून निविदा काढण्याचे काम हाती घेतले जात नसल्यामुळे शहरात सर्वत्र घाण पसरल्याचे चित्र दिसू लागले आहे. नव्या कंत्राटाच्या निविदा काढण्यात येणार असल्यामुळे जुना कंत्राटदार पुरेशा तत्परतेने कचरा उचलत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांमार्फत स्थायी समिती सभेत करण्यात येत आहेत. अशा तक्रारी करण्यात सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक आग्रही आहेत. प्रशासन तत्परतेने निविदा का काढत नाही, याविषयी महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असून नवी मुंबईतील एका बडय़ा नेत्याचा दबाव त्यास कारणीभूत असल्याचे बोलले जाते. महापालिकेतील कंत्राटी कामांमध्ये मोठय़ा प्रमाणावर टक्केवारी सुरू झाल्याची चर्चा असून निविदा काढण्यात होत असलेल्या उशिरामागे हेच प्रमुख कारण असल्याची चर्चा अगदी उघडपणे सुरू झाली आहे.  
कचरा सफाई आणि वाहतुकीच्या कामाच्या निविदा लवकरच काढण्यात येणार असून येत्या १५ दिवसांत यासंबंधीची प्रक्रिया सुरू केली जाईल, असा दावा महापालिकेचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी केला. निविदा काढण्यात उशीर का होत आहे याचे नेमके कारण सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या अस्तित्वात असलेल्या कंत्राटदारांमार्फत सफाईची कामे वेगाने सुरू करण्यात आली असून कचरा साचण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असेही सिन्नरकर यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा