उन्हाच्या चढत्या पाऱ्यासोबत सिडको वसाहतीमधील दरुगधी वाढली आहे. चार दिवसांपासून वसाहतींमधला कचरा न उचलल्याने दरुगधीमुळे वसाहती कोमेजून गेल्या आहेत. वसाहतींमधील मुख्य चौक, सोसायटय़ांच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याने ठाण मांडले आहे. अशा साचलेल्या कचऱ्याला बगल देत सिडकोच्या कारभाराविरोधात बोट मोडत नागरिक कचऱ्यातून आपली वाट शोधत आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये सिडको प्रशासन कचरा उचलणाऱ्या कंपनीविरोधात कागदोपत्री कारवाईत जुंपली आहे. पर्यायी कोणतीही उपाययोजना सिडकोने अद्याप वसाहतींमध्ये राबवलेली नाही. सिडकोच्या आरोग्य विभागाने या कंत्राटदार कंपनीला निष्क्रिय ठरवून या कंपनीकडून कंत्राट काढून टाकण्याचा प्रस्ताव सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्याकडे पाठविला आहे. भाटिया यांच्या कोर्टात या वादग्रस्त कंपनीविरोधी कारवाईच्या प्रस्तावावर शिक्का लागणे शिल्लक असल्याने सिडकोचे आरोग्य विभाग हतबल झाल्याचे सांगण्यात येत आहे.
‘संसदेचे स्वच्छतेचे काटेकोर काम करणारी बीव्हीजी कंपनी’ असा टेंभा मिरवत बीव्हीजीने आपले मार्केटिंग करून सिडको वसाहतींचे स्वच्छतेचे काम मिळवले. बीव्हीजीच्यापूर्वी खारघर, कामोठे, कळंबोली, खांदेश्वर आणि नवीन पनवेल या सिडको वसाहतींचा कचरा उचलण्याचे काम अॅन्थोनी कंपनीकडे होते. अॅन्थोनी कंपनीने कचरा उचलण्यासाठी केलेल्या दिरंगाईमुळे या कंपनीचा कंत्राटाचा कालावधी वाढविण्याऐवजी सिडकोने बीव्हीजी कंपनीला सिडको वसाहतींमधील कचरा उचलण्याचे काम दिले. दोन वर्षांपासून बीव्हीजीने हे काम सुरू केले, मात्र परिस्थिती बदलली नाही. अॅन्थोनीची जुळी बहीण बीव्हीजी याच ओळखीने बीव्हीजीने आपले स्थान कायम केले. दर महिन्याला सिडको वसाहतींमधील कचरा हा मुख्य प्रश्न सिडकोच्या आरोग्य विभागासमोर आला आहे. मात्र दंडात्मक कारवाई वगळता कठोर व ठाम भूमिका सिडकोच्या वतीने घेण्यात आली नाही. काही वेळा संतापलेल्या नागरिकांनी घरासमोरील साचलेला कचरा उचलून सिडको कार्यालयातही टाकला, मात्र सिडकोच्या आरोग्य विभागात ताठ कण्याचा कारभार नसल्याने हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढता आला नाही.
याबाबत सिडकोचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बावस्कर म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून कचरा उचलला नाही, याबाबत सिडकोकडे तक्रारी आल्या आहेत. त्याबद्दल सिडकोने कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीला दंडात्मक शिक्षा स्वरूपातची कारवाई केली आहे. वेळोवेळी समज आणि कारवाई करूनही बीव्हीजीने सुधारणा न केल्यामुळे तसा प्रस्ताव सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे पाठविला आहे. बीव्हीजी कंपनीने कामगारांचे कारण सांगून हा कचरा उचलण्याच्या कामात टाळाटाळ केली आहे. वाहनांवरील साफसफाई कामगार आणि बीव्हीजी कंपनी हा या दोनही वाद्यांचा अंतर्गत वाद आहे. या दोघांनीही सिडकोला आणि नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. लवकरच बीव्हीजीने कार्यपद्धतीमध्ये सुधारणा न केल्यास सिडकोच्या वतीने कराराचे उल्लंघन केल्यामुळे कठोर कारवाई करण्यात येईल. सिडको इतर पर्याय वापरून वसाहतींमधला कचरा उचलण्याचे काम युद्धपातळीवर करेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा