डोंबिवली पश्चिमेतील कचरा उचलणाऱ्या मे.अ‍ॅन्थोनी वेस्ट हॅन्डलिंग या ठेकेदाराने गेले दोन महिन्यांपासून कचरा उचलण्याचे काम थांबविले आहे. त्यामुळे डोंबिवली पश्चिम भागात रस्ते, गल्लीबोळात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पावसामुळे कचरा कुजू लागला आहे.
तीन महिन्यांपूर्वी महापालिकेच्या महासभेत डोंबिवली पश्चिमेतील कचऱ्याचा विषय उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी कचरा ठेकेदारावर विसंबून राहाण्याऐवजी प्रशासन स्वत:च्या गाडय़ा तसेच कामगार लावून हा कचरा उचलेल असे आश्वासन महासभेत दिले होते. या घटनेला दोन महिने उलटले तरी डोंबिवली पश्चिमेतील कचऱ्याचे ढीग कायम आहेत. मनसेने महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयात कचरा नेऊन टाकला होता. मनसे विद्यार्थी सेनेने स्वत:हून कचरा उचलण्याचा इशारा दिला होता. कचऱ्यामुळे डोंबिवली पश्चिमेतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचऱ्याचे ढीग पडून राहात असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. या प्रश्नावरून येत्या सर्वसाधारण सभेत रणकंदन होण्याची शक्यता असून विरोधी पक्षाचे नगरसेवक सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीला कोंडीत पकडण्याची तयारी करू लागले आहेत.

Story img Loader