सात वर्षांपूर्वी कचऱ्याचे आदर्श व्यवस्थापन करणारी नगरपालिका म्हणून लातूरचा सन्मान राज्य सरकारने केला होता. पुणेकरांना देखील कचरा व्यवस्थापनात लातूरचा आदर्श घ्या, असे म्हणण्याची वेळ आली होती. मात्र कचरा व्यवस्थापन बिघडले ते एवढे, की नव्याने कचरा व्यवस्थापनासाठी लातूरकरांना पुणे महापालिकेकडून व्यवस्थापनाचे धडे गिरवावे लागले. पुणे मनपा उपायुक्त सुरेश जगताप यांनी कचऱ्याचे आदर्श व्यवस्थापन कसे करावे, याबाबत नुकतेच मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनानंतर लातूर महापालिके ने कचरा प्रश्नी नव्याने काम करण्याचे ठरविले आहे.
केवळ पाच वर्षांत पुणे महापालिकेने कचरा प्रश्नाचा अभ्यास करून योग्य व्यवस्थापन केल्यामुळे पुण्यात कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी विविध प्रांतातील मुख्यमंत्र्यांसह अनेक मंडळी पुण्याला भेट देतात. लातूरच्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालल्यामुळे यावर स्थानिक मंडळींशी सल्लामसलत करून उपाययोजना सांगण्यासाठी पुणे येथील महापालिकेतील अधिकारी लातूरच्या भेटीवर आले होते. शनिवारी शहरालगतच्या वरवंटी कचरा डेपोची त्यांनी पाहणी केली. परिसरातील ग्रामस्थांशी चर्चा केली. महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शहरात गेल्या सहा-सात वर्षांपासून कचरा डेपोवर पडलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन झाले नाही. नव्याने कचरा जमा होतो, त्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न आहे. प्रारंभी कचरा डेपोवर जमा झालेल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा स्वतंत्र रीत्या विचार करत असतानाच नव्याने शहरातील गोळा होणारा कचरा तो ओला व सुका असे वर्गीकरण करून जमा झाला तर त्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न सुकर जाईल. साधारणपणे घरगुती कचऱ्यात ४५ टक्के जैविक भाग, ३० ते ४५ टक्के पुनप्र्रक्रिया करता येणारा कचरा असतो. १० ते १५ टक्के प्रक्रिया न करता येणारा कचरा जमा होतो. प्रत्येक घरात ओला व सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण झाले व ते दैनंदिन उचलण्याची व्यवस्था निर्माण झाली, की मग लोक त्यासाठी पसे देण्यासही तयार होतील, असे या वेळी सांगण्यात आले.
कचऱ्यापासूनची खतनिर्मिती, गांडूळ खत, बायोगॅस असे विविध छोटे प्रकल्प एकाच वेळी शहराच्या विविध भागात कार्यान्वित केले पाहिजेत. शहरात महापालिकेच्या जागेवर छोटय़ा वाहनातून कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करून मोठय़ा वाहनातूनच कचरा डेपोवर कचरा नेला पाहिजे. ज्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचेल. प्रारंभी शहरातील मोठे हॉटेल, मंगल कार्यालये यांना ओला व सुका कचरा स्वतंत्र रीत्या गोळा करण्याची सक्ती केली जाईल. त्यानंतर शहरवासीयांना या प्रक्रियेत सामावून घेतले जाईल. कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लातूरकरांनी सहभाग दिला तर कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होऊ शकते. मात्र, लातूरकरांनी त्याला सहकार्य करावे, असे आयुक्त तेलंग म्हणाले.