कचरावाहू वाहनांच्या अभावामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात
पालिकेच्या ताफ्यातील कचरा वाहून नेणाऱ्या काही ‘कॉम्पॅक्टर्स’ वाहनांची मुदत संपुष्टात आल्याने तसेच कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारांची नेमणूकही होऊ न शकल्याने मुंबईत अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य वाढू लागले आहे. पावसाळा सुरू झाल्याने हा कचरा अस्ताव्यस्त पसरून दरुगधीही वाढू लागली आहे. परिणामी आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करू लागले आहेत. नव्याने ‘कॉम्पॅक्टर्स’ दाखल करून घेण्यासाठी निविदा काढण्यात तसेच कंत्राटदारांचीही नेमणूक करण्यात पालिका प्रशासनाने दिरंगाई केल्यामुळेच मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आल्याची टीका होत आहे.
पालिकेचे सफाई कामगार दररोज नित्यनियमाने मुंबई झाडूनलोटून स्वच्छ करतात. गृहनिर्माण सोसायटय़ा, रस्त्यांवरील कचरा ठिकठिकाणच्या कचराकुंडय़ांमध्ये गोळा करतात. हा कचरा ‘कॉम्पॅक्टर’ वाहनांच्या माध्यमातून वाहून नेला जातो. पालिकेच्या ताफ्यामध्ये कचरा उचलणारे ११७ ‘कॉम्पॅक्टर्स’ असून त्यापैकी ६९ ‘कॉम्पॅक्टर्स’ची मुदत टप्प्याटप्प्याने संपुष्टात येत आहे. काही ‘कॉम्पॅक्टर्स’ची मुदत संपल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाला असून १ जूनपासून अनेक विभागातील कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. कचऱ्याच्या ढिगारा वेळीच उचलण्यात येत नसल्याने आणि आता पावसाच्या पाण्यामुळे दरुगधीयुक्त घाणेरडय़ा पाण्याचे पाट रस्त्यावरुन वाहू लागले आहेत. काही ठिकाणी जलवाहिन्यांलगतच पडलेल्या या कचऱ्यामुळे दूषित पाणीपुरवठा होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कचरा उचलण्यासाठी पालिकेने कंत्राटदारांची नियुक्ती केली होती. मात्र काही कंत्राटदारांची मुदतही संपुष्टात आली आहे. त्यामुळे विभागातील कचरा कुणी उचलायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. रस्त्यावर कचऱ्याचे ढीग वाढू लागताच नागरिकांनी पालिकेच्या विभाग कार्यालयांचे, तसेच नगरसेवकांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली. परंतु काही ठिकाणी कंत्राटदार, तर काही ठिकाणी ‘कॉम्पॅक्टर्स’ नसल्यामुळे कचरा पडून राहिला आहे. नागरिकांकडून रोष ओढवू नये यासाठी काही नगरसेवकांनी आता घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांना हाताशी धरून कचऱ्याचे ढीग उपसायला सुरुवात केली आहे. मात्र ‘कॉम्पॅक्टर्स’अभावी गाडे अडले आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या मिनतवाऱ्या केल्यानंतर दुसऱ्या एखाद्या विभागातील ‘कॉम्पॅक्टर्स’ची व्यवस्था करून कचरा उचलण्याचे काम करण्यात येत आहे. परंतु त्यासाठी तीन-चार दिवस लागत आहेत. तोपर्यंत कचरा पडून राहू लागल्याने घुशी, कुत्रे आणि माश्यांचा उपद्रव वाढू लागला आहे.
दरम्यान, जुन्या ‘कॉम्पॅक्टर्स’ची मुदत टप्प्याटप्प्याने संपुष्टात येत असल्याने ४८ नव्या ‘कॉम्पॅक्टर्स’साठी पालिकेने निविदा मागविल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजे ऑगस्टच्या सुमारास पालिकेच्या ताफ्यात नवे ‘कॉम्पॅक्टर्स’ दाखल होतील. मात्र ते टप्प्याटप्प्याने पालिकेला मिळणार आहेत, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. पालिकेच्या ताफ्यामधील ‘कॉम्पॅक्टर्स’ची मुदत संपुष्टात येणार याची कल्पना असतानाही प्रशासनाने वेळीच निविदा प्रक्रिया सुरू केली नाही. तसेच कंत्राटदारांच्या नियुक्त्यांबाबतही प्रशासन उदासीन आहे. त्यामुळे पालिका सभागृहात या प्रश्नाला वाचा फोडण्याची तयारी सर्वपक्षीय नगरसेवक करीत आहेत.
पाल्र्यात कचरा स्मारक!
पार्ले परिसरात ठिकठिकाणी आताच कचरा साठण्यास सुरुवात झाली आहे. महिनाभरापासून तक्रारी करूनही पालिका प्रशासन ढिम्म आहे. त्यातून कचऱ्याचे ढिगारे साठल्याने अखेर स्थानिक नगरसेविका ज्योती आळवणी यांनी या ढिगाऱ्यांना ‘कचरा स्मारक’ घोषित करणारे आंदोलन सुरू केले आहे. तसेच झाडे तोडण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदारांनी मोठे लाकूड पदरात पडेल अशाच झाडांची ‘कत्तल’ केली आणि पालापाचोळा, छोटय़ा फांद्या तिकडेच टाकून दिल्या. त्याचाही त्रास लोकांना होत आहे. याकडे लोकांनी लक्ष वेधल्यावर उद्यान खाते ‘घनकचरा व्यवस्थापन’ विभागावर जबाबदारी ढकलत आहे, असाही नागरिकांचा आरोप आहे.