ठाणे शहराच्या विकासावर गप्पा मारणाऱ्या महापालिका प्रशासनाला दोन आठवडय़ांनतरही कचरा संकटापासून ठाणेकरांना दिलासा देता आलेला नाही. आठवडा उलटूनही घंटागाडी कामगारांच्या काम बंद आंदोलनाचा तिढा सोडविण्यात राजकीय पुढाऱ्यांनाही सपशेल अपयश आल्याचे दिसून आले आहे. तसेच शहरातील कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तोकडी पडू लागल्याने शहरातील वेगवेगळ्या भागांत आता कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. अशी अवस्था ऐन पावसाळ्यात झाल्याने शहरात रोगराई पसरण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.
ठाणे, मुंब्रा तसेच कळवा परिसरातील कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडी कामगारांनी ‘समान काम..समान वेतन’ या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आठवडा उलटूनही आपल्या मागणीवर ठाम असल्याने अद्यापही या आंदोलनाचा तिढा सुटू शकलेला नाही. घंटागाडी कामगारांच्या आंदोलनामुळे शहरात कचरा साचण्याची भीती व्यक्त होऊ लागली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील कचरा उचलण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार केली. पण, घंटागाडी कामगारांच्या तुलनेत ही व्यवस्था आता अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. महापालिकेने संबंधित ठेकेदारांना नोटीस बजावून कामगारांना आंदोलन मागे घेण्यास सांगितले. पण, कामगार ठेकेदाराचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे ठेकेदाराने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने कामगारांचे आंदोलन बेकायदेशीर ठरविले. या निर्णयाविरोधात कामगारांनीही न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे ठेकेदार आणि कामगार यांच्यात न्यायालयीन पातळीवर लढाई सुरू आहे. मध्यंतरी, आंदोलन मागे घेत नसल्याने संबंधित ठेकेदाराने नव्या कामगारांची भरती प्रक्रिया सुरू करून कामगारांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केला. असे असले तरी कामगार आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे शहरातील कचरा समस्या अधिकच बिकट होऊ लागली आहे. शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या बडय़ा नेत्यांनीही या आंदोलनाचा तिढा सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पण, घंटागाडी कामगारांनी आधी आंदोलन मागे घ्यावे आणि त्यानंतर चर्चा करावी, अशी भूमिका महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी घेतली आहे. त्यामुळे या नेत्यांनाही तिढा सोडविताना अपयश आल्याचे दिसून आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घंटागाडी कामगारांची मागणी मान्य करता येणार नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात येते. मात्र असे असले तरी, कोर्टाच्या आदेशानुसारच ‘समान काम समान वेतन’ मागणी करत असल्याचे घंटागाडी कामगारांचे नेते महेंद्र हिरवाळे यांनी सांगितले. तसेच घंटागाडी कामगारांनी महापालिकेच्या कामगारांना मारहाण करून गाडय़ांची तोडफोड केली आहे. त्यामुळे महापालिका आणि घंटागाडी कामगारांमधील वाद अधिकच चिघळल्याने आंदोलनाचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. मात्र, त्याचा परिणाम आता शहरावर जाणवू लागला आहे. ठाणे, कळवा तसेच मुंब्रा परिसरातील वेगवेगळ्या भागांत कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र आहे. रविवारी महापालिकेच्या पर्यायी व्यवस्थेतील वाहने कचरा उचलण्यासाठी शहरात फिरकताना दिसली नाहीत. त्यामुळे शहरातील कचऱ्यात आणखी भर पडल्याचे दिसून आले. या संदर्भात, महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा