होळीच्या सणाच्या दिवशीसुद्धा सिडको वसाहतीमध्ये कचऱ्याला तुडवत रहिवाशांनी होळी साजरी केली. धूलिवंदनाच्या दिवसापर्यंत कचरा उचलला न गेल्याने नागरिकांना घरासमोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या दरुगधीत नाक मुठीत घेऊन धुळवड साजरी करावी लागली. सिडकोच्या आरोग्य विभागाने कचरा नियमित न उचलल्यामुळे सिडको वसाहतीमधील रहिवाशांचा वाढलेला संयमीपणा त्यामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. कचरा ही शहरातील मुख्य समस्या आहे, ती सुटूच शकत नाही, अशाच दरुगधीमध्ये दिवस काढायचे आहेत, असा संयमीपणा अनेकांच्या अंगी आता रुजला आहे. सिडकोने वीस वर्षांपूर्वी वसाहती वसविल्या, त्यामध्ये कळंबोलीचा समावेश आहे. वेळेत कचरा उचलला जात नसल्याने सिडको वसाहतीमध्ये कचऱ्याचे साठलेले ढीग हा मुख्य प्रश्न बनला आहे. कळंबोलीसारखीच अवस्था खारघर, कामोठे, नवीन पनवेल या वसाहतींची आहे. शहरांच्या बाजारपेठेमधील कचरा कुंडीत साचतो तिथली परिस्थिती बिकट आहे. चार वसाहतींमधील १५० टन कचरा उचलण्यास सिडको असमर्थ ठरत असल्याने लोकप्रतिनिधींनी ही तोंडओरड बंद केली आहे. निवेदने देऊन, कचरा अधिकाऱ्यांच्या दालनात टाकून हा प्रश्न सुटणार नाही, हे या लोकप्रतिनिधींच्या लक्षात आले आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी वसा उचललेल्या लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्न बघ्याची भूमिका का घेतली, हा प्रश्न सामान्यांना सतावत आहे. रस्ते साफ करणारे कर्मचारी आणि कचरा उचलणाऱ्या गाडीवर काम करणारे कर्मचारी सणासुदीच्या दिवशी सुट्टीवर जात असल्यामुळे हा पेच निर्माण होत असल्याचा युक्तिवाद सिडकोचे आरोग्य विभागातील अधिकारी अनेकदा मांडतात. बीव्हीजी या कंपनीला सिडकोने कचरा उचलण्याची जबाबदारी दिली आहे. या कंपनीची वाहने रस्त्यावर कचरा उचलताना दिसत नाही. कुंडय़ा भरून रस्त्यापर्यंत पसरणारा कचरा याचे प्रमाण थांबत नसल्याने कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर उपाय शोधण्यास सिडकोचे आरोग्य खाते अपयशी ठरल्याचे दिसते. याबाबत सिडकोचे आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. बी. एस. बावस्कर यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, होळीच्या सणामुळे मजुरांची कमी हजेरी लागल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरच वसाहतीमधील कचरा उचलण्यासाठी प्रयत्न करतो, असे सांगितले.
सिडको वसाहतीतील कचऱ्याचा प्रश्न कायम
होळीच्या सणाच्या दिवशीसुद्धा सिडको वसाहतीमध्ये कचऱ्याला तुडवत रहिवाशांनी होळी साजरी केली. धूलिवंदनाच्या दिवसापर्यंत कचरा उचलला न गेल्याने
First published on: 18-03-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garbage problem remain in cidco colony