कोणी म्हणाले, फवारणी व्यवस्थित होत नाही. काहींनी सांगितले, कचरा उचलला जात नाही. नगरसेवकांनी प्रश्न केले, कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित का लावली जात नाही? कचरा उचलल्यावर त्या जागेचे र्निजतुकीकरण व्हावे म्हणून डीटीटी पावडर का टाकली जात नाही? कचरा आणि अस्वच्छतेच्या प्रश्नावर महापालिकेत नगरसेवकांनी गांभीर्याने चर्चा केली आणि निष्कर्ष काढला, अधिकारी नगरसेवकांचे ऐकत नाहीत. प्रशासन व्यवस्थित काम करीत नाही, म्हणूनच शहरभर कचरा आहे. यावर प्रभागनिहाय सहा वर्ग १चे अधिकारी नेमून ज्या प्रभागात स्वच्छतेच्या कामासाठी कमी कामगार आहेत, तेथे ते वाढवून दिले जातील, असा खुलासा महापालिका आयुक्तांनी केला.
सर्वसाधारण सभेत महिला सदस्यांनी कचऱ्याच्या प्रश्नावर प्रशासनाला चांगलेच घेरले. शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे. २५ टक्केही साफसफाई होत नाही. मग पुतळ्यांचे प्रस्ताव कशासाठी आणले जातात, असा सवाल रेखा जयस्वाल यांनी केला. शहरातील बहुतांश भागात कचरा उचलला जात नाही, अशी तक्रार सत्ताधारी नगरसेवकांनीच केल्याने या विषयावर सभागृहात गंभीर चर्चा करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी आरोग्य अधिकाऱ्यांकडे आहे, त्यांना आरोग्यविषयक कार्यक्रमांचीही आखणी करायची असते. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनासाठी अन्य उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला नियुक्त करावे, अशी मागणीही नगरसेवक राजू वैद्य यांनी केली.
कचरा उचलल्यानंतर टाकायची पावडर गुरुवारीच उपलब्ध झाली. त्याचे वितरण तातडीने केले जाईल. उद्यापासून (शनिवार) त्यात बदल दिसतील, असे प्रभारी आयुक्त महेश पेडगावकर यांनी सांगितले. खादी ग्रामोद्योगाकडून या पावडरची खरेदी झाली असून लवकरच फवारणी सुरू करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. सर्वसाधारण सभा असते, त्याच दिवशी फवारणी होते, अशी तक्रार काही नगरसेवकांनी केली. काही भागात नगरसेवकांना अधिकारी व्यवस्थित माहिती देत नाहीत. अपुरे कर्मचारी, जेटिंग मशीनची कमतरता असल्याचे सांगतात. त्यामुळे नालेसफाई व कचरा उचलण्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
शहरात स्वच्छतेसाठी किती कर्मचारी आहेत? त्यांचे वेतन वेळेवर दिले जाते काय? दिले जात नसेल तर त्याची सोय काय? यावरही चर्चा झाली. शहरातील कचरा हटविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे महापौर कला ओझा यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा